विवस्त्र मारहाण : फिर्यादीच निघाले आरोपी

विवस्त्र मारहाण : फिर्यादीच निघाले आरोपी

पीडिता, तिचा पती, तिघा मित्रांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – अत्याचारीत प्रकरणातील पीडितेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडिता, पीडितेचा पती, गणेश सोपान झिरपे (रा. एकवीरा चौक, नगर), अक्षय राजेंद्र कुटे व किरण कुटे (दोघे रा. मढी, ता. पाथर्डी) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, पीडितेने विषारी औषध सेवन केल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी गुन्हा नोंदविताना समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल केला म्हणून माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे. अत्याचारातील पीडितेने पतीसह पोलिसांकडे तक्रार देत विवस्त्र करून अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद तोफखाना पोलिसांकडे दिली होती. याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. विधीमंडळात देखील त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाली. परंतु शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर या गुन्ह्यातील सत्यता सांगत, तपासात योग्यच आरोपींना अटक होईल, अशी भूमिका मांडली. अजित पवार यांनी या भूमिकेचे स्वागत करत तपासाला जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या.

याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा, तोफखाना, कोतवाली आणि सायबर सेल चौफेर तपास करत होते. सायबर सेलने व्हिडिओचा उलगडा केला. त्याचबरोबर गुन्ह्याचा गुंता सोडविला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांनी तपासात वेग घेतला.
पोलिसांनी पीडितेच्या पतीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीसमोर त्याने दम तोडला आणि घटनेची सत्यता सांगितली. त्याचबरोबर या व्हिडिओ मागचे खरे कारण पुढे आले.

पैसे कमविण्यासाठी पत्नीला बरोबर घेऊन हा व्हिडिओ मित्रांच्या मदतीने तयार केल्याचे पतीने पोलिसांसमोर सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या पतीचा नगरमधील मित्र गणेश झिरपे, पाथर्डीतील अक्षय कुटे आणि किरण कुटे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पीडितेला पोलिसांच्या या कारवाईची भनक लागली. पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी गेल्यावर तिने विषारी औषध सेवन केले. पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात येताच तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी दिली.

दरम्यान, पीडितेचा पती, त्याच्या तीन मित्रांनी हा व्हिडिओ कुठे आणि कसा तयार केला याची माहिती पोलिसांना दिली. पीडितने यापूर्वी दाखल केलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींनी विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण केल्याचे या व्हिडिओद्वारे दाखवायचे होते. हा व्हिडिओ व्हायरल करून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींकडून जास्त पैसे उकळायचे होते. कारण, आरोपी हे गुन्हा मिटविण्यासाठी कमी पैसे देत होते. यानुसार हा व्हिडिओ नगरमधील स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रुस हायस्कुलच्या वर्ग खोल्यांमध्ये तयार करण्यात आला. या सर्व घटनाक्रमाची माहिती पीडितेच्या पतीसह त्याच्या मित्रांनी पोलिसांच्या चौकशीत दिली असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.

पीडितेने घेतले विषारी औषध
व्हिडिओतील विसंगतीमुळे पोलिसांनी तपासात लिड घेतला. त्याचबरोबर पीडितेच्या पतीला ताब्यात घेतले. मित्रांना देखील हेरले. याची कुणकुण पीडितेला लागली. तोफखाना पोलीस या पीडितेला ताब्यात घेण्यासाठी गेले. आपले कुभांड फुटले आहे, हे लक्षात येताच ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना पीडितेने गुंगार दिला आणि विषारी औषध घेतले. ताब्यात घेण्यासाठी महिला पोलीस होत्या. ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय उपचारानंतर पीडितेची प्रकृती आता स्थिर आहे.

त्या पाच जणांना सोडले
विवस्त्र करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे दोन दिवस कसून चौकशी केली. परंतु त्यांच्या चौकशीत काहीच आढळले नाही. त्यामुळे तपासाची दिशा बदलली आणि व्हिडिओचे बिंग फुटले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या पाच जणांना गुरुवारी सकाळी सोडले. तत्पूर्वी या पाच जणांपैकी तिघांचा न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जबाब नोंदविला असल्याचे समजते. याबाबत मात्र पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com