कोरोना : बेलापुरात बाहेरच्यांना गावबंदी
Featured

कोरोना : बेलापुरात बाहेरच्यांना गावबंदी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

बेलापूर (वार्ताहर) – कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून बेलापूर ग्रामस्थांनी गावच्या सर्व सीमा बंद केल्या असून बाहेरुन येणार्‍यांना गावबंदी केली आहे. गावकर्‍यांनी खडा पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पोलीस गस्त पण वाढविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये या करीता राज्यबंदी त्याच बरोबर जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर बाहेर गावहुन एखादा कोरोना बाधीत गावात येऊ नये या करीता ग्रामस्थांनी गावात येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.

श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर पोलिसांचा कडा पहारा आहे. तसेच उक्कलगाव चौफुलीवरुन कुणी गावात येऊ नये म्हणून या रस्त्यावर तीन ट्रकच आडव्या लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तर पढेगावहुन येणार्‍या रस्त्ता अँगलच्या सहाय्याने बंद करण्यात आला आहे. गावात दवंडी देवून जनजागृती करण्यात येत आली. सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे अखेर पोलिसांनी गर्दी पांगविली तसेच विनाकारण मोटारसायकलवर फिरणार्‍यांच्या मोटारसायकलची हवा पोलिसांनी सोडुन दिली तर काहींना उठबश्या काढण्यास भाग पाडले. काहींना पोलिसांच्या लाठीचाही प्रसाद मिळाला. बेलापूर ग्रामपंचायतीने घरोघर जावुन नागरिकांना हात धुण्यासाठी साबण वाटप केले. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नका, गर्दी करु नका, नियम पाळा असे अवाहन बेलापूर ग्रामपंचायत व बेलापूर पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com