Friday, April 26, 2024
Homeनगरडॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा

डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षांसाठी सभापती पदासाठी आरक्षण सोडत काल निघाली. त्यात श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) महिलेसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे टाकळीभान पंचायत समिती राखीव गणातून निवडून आलेल्या ससाणे गटाच्या डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांची सभापतिपदी वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये आठ सदस्य संख्या आहे. त्यात चार महिला सदस्य तर चार पुरुष सदस्य आहेत. गेल्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मुरकुटे-ससाणे या दोन गटाचे समसमान चार-चार सदस्य निवडून आले होते. पहिली अडीच वर्षे सभापतीपद खुले असल्याने मुरकुटे (महाआघाडी) गटाकडून दीपक पटारे तर ससाणे (काँग्रेस) गटाकडून अरुण पाटील नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही उमेदवारांना समसमान चार-चार मते मिळाल्याने चिठ्ठी टाकण्यात आली होती. त्यावेळी सभापतीपदी दीपक पटारे यांची लॉटरी लागली होती.

- Advertisement -

महिला सदस्यांपैकी दत्तनगर गणातील संगीता सुनील शिंदे या सर्वसाधारण खुल्या महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. उक्कलगाव गणातील कल्याणी सतीश कानडे या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून तर उंदिरगाव गणातील वैशाली अशोक मोरे या अनु.जाती महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निघाल्याने टाकळीभान (ना.मा.प्र.महिला) राखीव गणातून निवडून आलेल्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचीच सभापतीपदी लागणार हे निश्चित झाले आहे.

पुढील अडीच वर्षासाठी सभापती पदाची माळ डॉ.वंदना मुरकुटे यांच्या गळ्यात पडणार असल्याने सोशल मीडियातून त्यांच्यावर आभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. डॉ. मुरकुटे या ससाणे गटाच्या कट्टर समर्थक असल्याने पुढील अडीच वर्षासाठी पंचायत समितीची सत्ता ससाणे गटाकडे जाणार हे उघड झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या