अस्वस्थ अमेरिकन, तरीही ट्रम्प निर्धास्त
Featured

अस्वस्थ अमेरिकन, तरीही ट्रम्प निर्धास्त

Balvant Gaikwad

अमेरिकी अध्यक्षपदाच्या नियोजीत निवडणुकीत गेल्या काही दिवसांत तीन खास वळणं अनुभवायला मिळाली. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ‘अमेरिकन फर्स्ट’चा नारा बुलंद केला. अमेरिकेत वंशवादविरोधी संघर्ष सुरू असला आणि कोरोनाच्या हाताळणीत अपयशी ठरले तरी भावनिकतेच्या मार्गाने गोर्या नागरिकांची फळी उभी करत ट्रम्प अध्यक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेतल्या अस्वस्थ जनमानसाचा हा मागोवा.

 प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

गेल्या पावणेचार वर्षांमध्ये जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या विक्षिप्त आणि धोरणसातत्याचा अनुभव असलेल्या अध्यक्षांची वागणूक पहायला मिळाली. खरं तर त्यांच्यासारख्यांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडे तसा चांगला उमेदवारही नव्हता. हिलरी क्लिटंन यांनी तर निवडणुकीतून केव्हाच माघार घेतलेली. त्यामुळे सहा-सात महिन्यांपूर्वी ट्रम्प हेच पुन्हा अध्यक्ष होतील, असं छातीठोकपणे सांगितलं गेलं. त्यानंतर कोरोनाची लागण झाली. त्या काळात अमेरिकेतली परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प यांना अपयश आलं. गेल्या चार वर्षांमध्ये ‘अमेरिकन फर्स्ट’ची घोषणा करूनही किती अमेरिकन तरुणांना नोकर्या मिळाल्या, हा वादाचा विषय झाला. उलट, अनेकांच्या आहे त्या नोकर्या गेल्या. आता कोरोनाच्या काळात तर चार कोटी लोक बेरोजगार झाले.

चीन, इराणबरोबर युद्धाचं वातावरण तयार करायचं, उत्तर कोरियाविरोधात शस्त्रं डागायची आणि त्यांच्याच गळ्यात गळा घालायचा, असे किती तरी प्रकार ट्रम्प यांनी केले. जगात शांतता प्रस्थापित करण्यात आपण किती महत्त्वाची भूमिका बजावतो आहे, भारत-पाकिस्तान, भारत-चीन यांच्यातल्या वादांमध्ये मध्यस्थी करायची आपली कशी तयारी आहे, हे सांगताना आपल्याला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी कसं डावललं जात आहे, असा कांगावा करण्याबाबत ट्रम्प यशस्वी ठरले आहेत.
कोरोनाच्या हाताळणीत त्यांना अपयश आलं. रुग्णसंख्या वीस लाखांच्या घरात तर मृत्यूही दीड लाखांपर्यंत असं चित्र तयार झालं. ट्रम्प यांनी जाहीर केलेली पॅकेजेस फारशी उपयुक्त ठरली नाहीत. त्यांचा या निवडणुकीत पराभव होईल, असं चित्र तयार व्हायला लागलं. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था, तिथले मूलभूत प्रश्न, बेरोजगारी आदी विषय मागे पडायला लागले.

पहिल्याच सर्वेक्षणात ट्रम्प निवडणुकीत मागे पडल्याचं चित्र पुढे आलं. त्यामुळे त्यांनी प्रचाराची दिशाच बदलून टाकली. त्यांचा प्रचार राष्ट्रवाद, अमेरिकन फर्स्ट, चीनची आक्रमकता या मुद्द्यांभोवती केंद्रित व्हायला लागला. ‘माझा पराभव करण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाईल,’ असं सांगायला ट्रम्प सुरुवात केली. विशेष म्हणजे याच ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वी हिलरी क्लिटंन यांच्या पराभवासाठी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची मदत घेतली होती. कोरोना जगभर पसरायला चीन कारणीभूत आहे, चीननं कोरोनाच्या विषाणूची निर्मिती केली, असा आरोप करून चीनच्या विरोधात श्वेतवर्णीय देशांची एक आघाडी तयार केली आहे.

अमेरिकेत पोलिसांनी केलेल्या जॉर्ज फ्लॉईड याच्या हत्येवरून सध्या निदर्शनं करण्यात येत आहेत. जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटत आहेत. ट्रम्प यांनी लष्कर घुसवण्याची भाषा केल्याचे तसंच आंदोलन चिरडून टाकण्याचा इशारा दिल्याचे पडसाद अमेरिकेत उमटले आहेत. त्यांच्या या अशा वावदूक वर्तनाने त्यांचे काही सहकारीही नाराज झाले.

एका पोलिस अधिकार्यानं तर थेट ट्रम्प यांना सुनावलं. त्यामुळे आंदोलकांचा जोश वाढला. व्हाईट हाऊससमोर निदर्शनं झाली. त्यांना काही काळ बंकरमध्ये लपून बसावं लागलं. ही परिस्थिती लक्षात घेतली तर ट्रम्प यांचा पराभव होईल, असं कुणालाही वाटेल. परंतु असं असलं तरी कागदोपत्री जे दिसतं ते तसंच असतं असं नाही. भावनिक मुद्दे आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यापुढे मूलभूत प्रश्न मागे पडत असतात. तसंच काहीसं आगामी चार महिन्यांमध्ये घडल्यास आश्चर्य वाटू नये.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लीकन पक्षाची उमेदवारी ट्रम्प यांना मिळणार, यात कोणताही संदेह नव्हता. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जोरात तयारीही केली होती. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरत नव्हता. हिलरी क्लिटंन यांनी स्वतःच उमेदवारी नाकारल्यानं अन्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. सँडर्सही मागे पडले. त्यानंतर अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. कोरोना साथ, कोसळलेली अर्थव्यवस्था आणि नागरिकांमधला असंतोष या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्यासमोर बायडेन किती आव्हान उभं करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. ‘प्रायमरी’ निवडणुकांमध्ये बायडेन यांनी सात राज्यांमध्ये विजय मिळवला.
एकूण 1991 प्रतिनिधी बायडेन यांच्यासोबत आहेत. अद्याप आणखी आठ राज्यं आणि तीन प्रदेशांमध्ये प्रायमरी निवडणुका होणं बाकी आहे. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात 77 वर्षीय बायडेन उपाध्यक्ष होते. तत्पूर्वी त्यांनी 36 वर्षीय सिनेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. बायडेन यांचा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी हा तिसरा प्रयत्न असून त्यांना असलेल्या कृष्णवर्णीयांच्या जोरदार पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचं बोललं जाते. नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया, टेनेसी आणि टेक्सास इथल्या प्रायमरी निवडणुकांमधल्या कामगिरीनं बायडेन यांच्या उमेदवारीला बळ मिळालं.

नुकत्याच घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 14 टक्के आफ्रिकन-अमेरिकनांचा कल विद्यमान ट्रम्प यांच्याकडे असून 75 टक्के लोकांची पसंती बायडेन यांना आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बायडेन यांनी फ्लॉईड यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. बायडेन कृष्णवर्णीयांची मतं खेचायचा जितका प्रयत्न करतील, तितका ट्रम्प यांना फायदा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अमेरिकेत झालेल्या कृष्णवर्णीयांच्या हत्यांपैकी फारच कमी प्रकरणं शिक्षेपर्यंत गेली. गेल्या 55 वर्षांमधल्या अशा नऊ महत्त्वाच्या प्रकरणापैकी सात प्रकरणांमध्ये कृष्णवर्णीयांच्या हत्येत श्वेतवर्णीय पोलिस अधिकार्यांचा समावेश होता.

कृष्णवर्णीयांनी त्यावर वारंवार आवाज उठवूनही काही झालं नाही. आताही काही होण्याची शक्यता नाही; मात्र यामुळे मतांचं ध्रुवीकरण होऊन ट्रम्प यांनाच फायदा होण्याची शक्यता सध्या तरी दिसते. ट्रम्प यांनी याच मुद्दयाबरोबर आता जागतिक आघाड्या तयार करायला सुरुवात केली आहे. चीनची कोंडी करण्यासाठी जी-7 राष्ट्रांमध्ये आणखी चार राष्ट्रांचा समावेश करण्याचं घाटत आहे. त्यात रशिया, भारत, ऑस्ट्रेलियासह अन्य एका राष्ट्राचा समावेश आहे. जी-7 राष्ट्रांचा विस्तार करताना आणखी एक आघाडी उघडली आहे. त्यात ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांचा समावेश आहे. त्यातून चीनच्या वाढत्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी आपण किती आघाड्यांवर प्रयत्न करत आहोत, हे ट्रम्प यांना दाखवून द्यायचं आहे.

चीनची तळी उचलणार्या जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात जायलाही आपण कमी करत नाही, असं ट्रम्प यांनी दाखवून दिलं. जागतिक आरोग्य संघटनेची वर्गणी भरायला नकार दिला. जागतिक आरोग्य संघटनेत तैवानला घेतलं पाहिजे, अशी भूमिका घेतली. अमेरिकेसारख्या जगातल्या सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य देशात कोरोनाचे एवढे बळी कसे असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.
ट्रम्प पुन्हा निवडणुकीला उभे राहणार आहेत. कोरोनाच्या सदोष हाताळणीचा फटका बसण्याची शक्यता असल्यानंच ट्रम्प यांचा नॉन इश्यूभोवती निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकन सिनेटमधले रिपब्लिकन पक्षाचे अनेक सदस्य टाळेबंदी लवकर संपवू नका, असं आवाहन अध्यक्षांना सातत्यानं करत होते; परंतु ट्रम्प यांना अमेरिकनांच्या आरोग्यापेक्षा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याची अधिक काळजी आहे. त्यांनी ते कृतीतून दाखवून दिलं.

वर्णद्वेषाच्या मुदद्द्यावरून अमेरिकेत सुरू असलेला हिंसाचार आणि जाळपोळ आठवड्यानंतर आता शांत होत आहे. आंदोलकांनी आता शांततापूर्ण आंदोलन करून घटनेचा निषेध केला. मास्क बांधून रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी मूलभूत बदलांची मागणी केली. उत्तर कॅरोलिना इथे जॉर्ज फ्लॉइडच्या शवपेटीचं दर्शन घेण्यासाठी आंदोलकांनी गर्दी केली होती. अमेरिकेत सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद लंडन, फ्रान्समध्येही उमटले. अमेरिकेत सिएटल येथे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तसंच विस्फोटक पदार्थांचा माराही केला होता. त्यामुळे काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी मिरचीची पूड असलेला स्प्रे फवारला. वॉशिंग्टनमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. नॅशनल मॉलसह आसपासच्या परिसराला आंदोलकांनी घेरलं होतं. पोलिसांच्या वर्दीवर कॅमेरा बसवण्यात यावा आणि त्यांच्याकडून कोणाचाही गळा दाबण्यावर बंदी घालण्यात यावी, असी मागणी आंदोलक करत होते.

आंदोलनाला फारसं महत्त्व न देता ‘वॉशिंग्टनमध्ये अत्यंत कमी गर्दी आहे,’ असं ‘ट्वीट’ ट्रम्प यांनी केलं. ‘कृष्णवर्णीयांनाही जगण्याचा अधिकार आहे,’ अशा आशयाचे पोस्टर बहुसंख्य आंदोलकांच्या हातात होते. ट्रम्प आणि बायडन या दोघांची मूल्यं वेगळी आहेत. ट्रम्प यांची तीन वर्षांमधली कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांचा पैसा 2016 मध्ये प्रभावी ठरला.
रशियाची पडद्याआडून मदतही निर्णायक ठरली. अमेरिकी कॉर्पोरेट जगत, त्यांच्या अधिन असलेली काही प्रसारमाध्यमं कोरोनानं पोचवलेली सामान्यांची झळ दडपू शकणार नाहीत. बायडेन यांना माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही पाठिंबा दिला आहे. देशातले अन्य प्रमुख नेते सँडर्स यांनीही आपल्या अनुयायांना बायडन यांच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षानं ऐक्याचं चित्र निर्माण केलं आहे. कोरोनापूर्वीची गणितं उधळली गेल्यानं ट्रम्प यांना आता नव्या भावनेला आवाहन करणार्या मुद्द्यांची गरज निर्माण झाली आहे. कोरोना महामारीचं खापर त्यांनी चीनबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेवरही फोडलं आहे.

अमेरिकी नागरिकांना आपलं आर्थिक, सामाजिक जीवन लवकरात लवकर पूर्ववत व्हावं, असं वाटत आहे. कोरोनाच्या आघातानं कोट्यवधी लोकांचा आत्मविश्वास खचला आहे. त्यात ट्रम्प यांचे दोषारोप त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. त्यामुळेच अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. असं असलं, तरी मागच्या निवडणुकीत जसं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत क्लिटंन यांच्या विजयाची खात्री दिली जात होती आणि शेवटी ट्रम्प जिंकले, तसंच आताही बायडेन यांना मिळणारा प्रतिसाद सध्या अधिक असला तरी लोकांनी भावनिक मुद्द्यांवर भर दिला, तर ट्रम्प यांचा विजयरथ बायडेन रोखू शकणार नाहीत.

Deshdoot
www.deshdoot.com