अनधिकृत सावकारकीचे लोण ग्रामीण भागापर्यंत; शेतकर्‍यांच्या जमिनी घशात

jalgaon-digital
3 Min Read

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात खाजगी सावकाराचा सुळसुळाट सुरू असल्याने अनधिकृतपणे खाजगी सावकार शेकडा 20 ते 40 टक्के व्याजदराने पैसे देत आहेत. दिलेले पैसे वसुलीसाठी वेळप्रसंगी दहशत आणि घेतलेल्या कोर्‍या धनादेशाचा गैरवापर करून थेट कोर्ट केसेस करण्याच्या धमक्या देत असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र तक्रार केल्यास नसती आफत ओढवून घेण्यापेक्षा गप्प बसलेले बरे असे असताना तालुक्यातील ग्रामीण भागातून देखील अशा सावकारांच्या जाचाला कंटाळून जमिनी सावकारांच्या घशात गेल्या असल्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

दैनिक सार्वमत मध्ये दोन दिवसांपासून अनधिकृत सावकारांच्या बाबत बातम्या प्रसिद्ध होत आहे. शहरात अनेकांनी बातम्याचे कात्रण करून ठेवले असताना ग्रामीण भागातील अशा प्रकारे सावकारांच्या जाचाला कंटाळून वेळप्रसंगी जमीन जायदाद लिहून द्यावी लागली असल्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र एवढा अन्याय होऊनही तक्रार का दाखल केल्या नाहीत असे विचारले असताना एकमेव कारण हे या सावकारांच्या दहशत हेच असल्याचे समोर आले आहे. अशा तक्रारी केल्यास आधार कुणाचा नसल्याने अन्याय सहन करणारे गप्प आहेत.

शहरात आणि तालुक्यात अनेक तरुण छोटे मोठे व्यवसाय करत आहेत. या व्यवसायात आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी अनेक वेळा बँक, पतसंस्थाच्या कडे कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज अनेकांना उपलब्ध होते. मात्र अनेक जणांना कुठली पत नसल्याने सहज कर्ज उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती असल्याने आपली गरज पूर्ण करण्यासाठी कुणापुढे तरी हाथ पसरावे लागत असतात. बँक, पतसंस्थामधून गरज सुटत असली तरी सगळ्यांना कर्ज मिळतेच असे नाही.

यापुढे जाऊन ऐन वेळी कुणी कर्ज देते असे ही नसल्याने तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी अनेक वेळा खाजगी सावकारांच्या दारात जावे लागत असल्याने शहरात असे कर्ज देणारे अनेक जण आहेत. यांच्याकडे कुठला परवाना नाही मात्र ऐन वेळी कुणाच्या तरी मध्यस्थी ने पैसे दिले जात असले तरी एक महिन्यासाठी शेकडा पंधरा ते वीस टक्के प्रमाणे हे सावकार पैसे देत आहेत हे कर्जापेक्षा व्याज जास्त होत असल्याने अनेक तरुण या ओझ्याखाली दबले आहेत असे असले तरी ग्रामीण भागात आदिवासी भटक्या समाजाचे काही व्यक्तीकडून घेतलेले कर्ज फेडता आले नसल्याने वेळप्रसंगी दुपटीने पैसे देऊनही जमीन लिहून द्यावी लागली असल्याचे सांगितले आहे.

कारवाई करणार :सहायक निबंधक
श्रीगोंदा तालुक्यात 10 सावकारांना अधिकृत लायसन्स आहेत, पण अनेक जण खाजगी सावकारकीचा व्यवसाय करतात अशी चर्चा आहे. जे लोक खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकले त्यांनी तात्काळ तक्रार द्यावी. सावकारांवर कारवाई करण्यात येईल असे सह्ययक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सांगितले.

तक्रार द्या मुसक्या आवळणार : पोलीस निरीक्षक
श्रीगोंदा तालुक्यातील ज्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे घेतले आहेत, त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कराव्यात. लगेच त्यांच्या मुसक्या आवळ्या जातील असे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *