दिल्लीतील मरकजमधून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह
Featured

दिल्लीतील मरकजमधून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Dhananjay Shinde

पुणे (प्रतिनिधी) – नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील दोघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली येथील निजामुद्दीन तबलिगी जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या 14 पैकी दोघांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. हा अहवाल गुरूवारी (दि.2) प्राप्त झाला आहे. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित 11 जणांचे अहवाल निगेटीव्ह असून, खरबदारी म्हणून त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे.

शहरातील एकूण 23 जण व त्यांच्या संपर्कात आलेल्या 5 नातेवाईकांना असे एकूण 28 जणांना पालिकेच्या वायसीएम व भोसरी रूग्णालयात मंगळवारी (दि.31) व बुधवारी (दि.1) दाखल करण्यात आले. त्याच्या घशातील स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यापैकी 14 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

दोघे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्याच्यावर पालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळीचा शोध पालिका प्रशासन घेत आहे. इतर 14 जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
तबलिगीफच्या मेळाव्यात बारामतीतील चौघांच्या समावेशाची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात तिघेच त्या ठिकाणी हजर असल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत दिसून आले. यातील एका तरुणाचे सीमकार्ड त्याचा भाऊ वापरत असून, तो दिल्लीतच असल्याचे प्रशासनाला आढळून आले. अन्य तिघांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु तरीही विशेष खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती येथील 3 लोकांचा या मेळाव्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य विभागाने त्या नागरिकांना घरात राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये दि. 2 एप्रिल दुपारी 2.00 वाजेपर्यत एकूण 3 ने वाढ झाली असून पुण्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. तर पिंपरी-चिंचवड मध्ये 12 झाली आहे. पुणे विभागातील एकूण कोरोना बाधितांची संख्या संख्या 80 झाली आहे. ( पुणे -39, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2, सांगली 25 आणि कोल्हापूर 2).

तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1839 होते. त्यापैकी 1663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 176 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालां पैकी 1544 नमुने निगेटीव्ह आहेत व 80 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 8119 प्रवाशांपैकी 4214 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून 3905 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 10 लक्ष 79 हजार 111 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 48 लक्ष 72 हजार 779 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 441 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

संचारबंदीचे उल्लंघन : 1516 वाहने जप्त
दरम्यान, पुणे शहरात लागू असलेल्या संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने एक एप्रिलला 382 नागरिकांवर कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 1287 नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे, तर 1516 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोरोनाफचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही, आणि घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन केलं जात असले तरी पुण्यातील तब्बल 91 हजार 860 जणांनी डिजिटल पाससाठी अर्ज भरुन दिले आहेत. मात्र, पोलिसांनी 47 हजार 452 जणांचे अर्ज नामंजूर केले आहेत. केवळफ 19 हजार 860 जणांचे अर्ज मंजूर करुन त्यांना डिजिटल पास देण्यात आले आहेत. डिजिटल पासधारकांना संचारबंदीच्या काळातही प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र डिजिटल पाससाठी अनेकांनी दिलेली कारणे पटण्यासारखी नसून वैद्यकीय उपचार हे कारण सर्वाधिक व्यक्तींनी दिलं आहे. पोलिसांकडे अद्याप 24 हजार 268 अर्ज प्रलंबित आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com