उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सरसकट कर्जमाफी घोषणेची शक्यता ?

उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सरसकट कर्जमाफी घोषणेची शक्यता ?

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरुन उद्या उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात यावर्षी ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या परिस्थित राज्यात विधानसभा निवडणूक झाली. मात्र, सरकार स्थापन व्हायला प्रचंड विलंब झाला. दरम्यान, मुख्यमंत्री होण्याअगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर सरसकट शेतकरी कर्जमाफी करु, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने आता शिवसेना सत्तेत आली आहे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्या ते शिवनेरी गडावर जाणार आहेत.

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती. शेतकर्‍यांना तुटपुंज्या नाही तर भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असल्याचे ठाकरे म्हणाले होते. त्याचबरोबर आतापर्यंत शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेल्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीचा लेखाजोखा मंत्रीमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली होती. दरम्यान, या कर्जमाफीसाठी सुमारे 60 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. कर्जमाफीची लागू झाल्यावर राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम पडणार आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com