दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
Featured

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूरन रोडने राहुरीच्या दिशेने नगर-मनमाड रोडवर दरोडा टाकण्यासाठी चाललेल्या सराईत टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडा टाकण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या. सागर अण्णासाहेब भांड (वय- 24 रा. नागापूर, नगर), किरण रावसाहेब जरे (वय- 33 रा. नालेगाव, नगर), अमोल जगन कदम (वय- 28 रा. दरेवाडी ता. नगर), श्रीकांत सुरेश लाहूंडे (वय- 19 रा. ताहाराबाद ता. राहुरी), अल्लाउद्दीन इब्राहीम शेख (वय- 23 रा. कोल्हार बु. ता. राहाता), दीपक रवीकांत उपाध्याय (वय- 25 रा. नवनागापूर, नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (रा. गोधेगाव ता. नेवासा) हा पळून जाण्यात यशस्वी ठरला.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, भांड हा त्याच्या सहा ते सात साथीदारांसह तीन दुचाकींवरून शनिशिंगणापूर रोडने राहुरीच्या दिशेेने नगर-मनमाड रोडवर कोठेतरी दरोडा घालण्यासाठी जात असल्याची माहिती शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बातमीदारांमार्फत मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक शिरीशकुमार देशमुख, सहायक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलीस हवालदार बाळासाहेब मुळीक, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, अशोक गुंजाळ, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, रवी सोनटक्के, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, सचिन कोळेकर यांच्या पथकाने दोन पंचांसह शनिशिंगणापूर फाटा येथे सापळा लावला.

काही वेळातच शनिशिंगणापूरकडून नगर-मनमाड रोडकडे तीन दुचाकी येताना पथकाला दिसल्या. यावेळी पथकाने सावध पवित्रा घेत एकाचवेळी रोडवर येत दुचाकीवर बॅटरी चमकवत आरोपींना थांबवले. दुचाकीचा वेग कमी होताच पथकाने घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. यातील एक जण घटनास्थळावरून पसार झाला. आरोपींकडून दोन दुचाकी, लोखंडी कोयता, सत्तूर, लाकडी दांडके, सुरा, नायलॉन दोरी, मिरची पूड, सहा मोबाईल असा एक लाख 21 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस हवालदार शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.

Deshdoot
www.deshdoot.com