भगूरजवळील भरवीर खुर्दमध्ये ‘दंगल’ची पुनरावृत्ती; कुस्तीमध्ये साक्षीसारखी उंची गाठण्याचे प्रतिभाचे स्वप्न
Featured

भगूरजवळील भरवीर खुर्दमध्ये ‘दंगल’ची पुनरावृत्ती; कुस्तीमध्ये साक्षीसारखी उंची गाठण्याचे प्रतिभाचे स्वप्न

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

देवळाली कॅम्प । सुधाकर गोडसे

कुस्तीचा कोणताही वारसा नसताना आई-वडिलांनी दिलेले प्रोत्साहन, जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिच्यासारखे यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहणारी 13 वर्षीय प्रतिभा सारूक्ते ही गाव ते राज्यपातळीवर गाजत आहे.

भगूरजवळील भरवीर खुर्द या खेडेगावातील प्रतिभा ही विद्यार्थिनी कुस्ती खेळाने झपाटली आहे. आठवीत शिकत असलेल्या प्रतिभाने गेल्या दोन वर्षांत अनेक शालेय व खुल्या गटातील स्पर्धांमध्ये मैदान गाजवले आहे. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर कोल्हापूरमधील नामवंत मल्लांना आव्हान देण्याचे तिचे धाडस कौतुकास्पद ठरत आहे. वडील भास्करराव यांना व्यायामाची आवड असली तरी तालुकास्तरावरच त्यांची कुस्ती मर्यादित राहिली.

मुलीला पहिलवान बनवायचे हे ध्येय बाळगून त्यांनी तिला घरातच कुस्तीचे डावपेच शिकवले. कुस्तीमधील तिचे गुण ओळखून तिला साकूर फाटा येथील ज्ञानेश्वर शिंदे यांच्या तालमीत पाठवले. गाव ते साकूर फाटा हे 5 कि.मी.चे अंतर प्रतिभा दररोज पहाटे 5 वाजता धावत पूर्ण करते. तिथे ती जोर बैठका, सफाटे, दोरीच्या सहाय्याने चढउतर करणे, डंबेल्स व कुस्तीचे डाव यांचा दोन तास व्यायाम करते. पुन्हा धावत घरी येऊन नियमित शाळेला जाते. सायंकाळी पुन्हा दोन तास कुस्तीचा सराव असा तिचा दिनक्रम आहे.

गेल्या दोन वर्षांत तिचे वजन 30-35 किलो असताना 50 किलो गटात तिने काही सेकंदातच प्रतिस्पर्ध्यांना चितपट केले आहे. नुकतेच तिने आळंदी येथील जोग महाराज व्यायामशाळेने आयोजित केलेल्या राज्यपातळीवरील खुल्या कुस्ती स्पर्धेत अनेकांच्या भुवया उंचावणारी कामगिरी केली. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर येथील नामांकित मल्लांना तिने धोबीपछाड दिली आहे. ढाक डावात तिचा हातखंडा असून प्रसंगी पट काढण्यातही ती पटाईत आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तिने आपल्या वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उत्तर महाराष्ट्र केसरी बाळू बोडके, महाराष्ट्र चॅम्पियन प्रवीण पाळदे, रामचंद्र पाळदे, सुधीर पाळदे, संदीप गायकर आदींचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.

 आई-वडील शेतकरी असून आपल्या कुस्तीच्या छंदासाठी सर्व काही सहन करतात. अभ्यास करून या क्षेत्रात आपल्याला मोठी भरारी घ्यायची आहे. केवळ जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर मोठे करावयाचे आहे.

प्रतिभा सारूक्ते

Deshdoot
www.deshdoot.com