125 शिक्षक संकटात
Featured

125 शिक्षक संकटात

Sarvmat Digital

  • बीएड, पदवी पूर्ण करणार्‍या 125 शिक्षकांना नोटीस
  • रजेच्या कालावधीबाबत मागवणार अधिकृत पुरावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापन करत असताना एकाचवेळी बीएड आणि पदवीचे शिक्षण कसे पूर्ण केले, याबाबत संशय व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना नोटीस काढून त्यांच्याकडून रजेच्या कालावधीचा अधिकृत पुरावाच मागितला आहे. या 125 शिक्षकांना एकतर शाळेत अध्यापन केलेलेे असेल अन्यथा शाळेत सुट्टी टाकून महाविद्यालयात हजेरी लावलेली असेल, या दोन्ही प्रकारांत तफावत असणार्‍या शिक्षकांवर फसवणूक अथवा खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी कारवाईची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत झालेल्या चर्चेनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या प्राथमिक शिक्षकांची बीएड आणि पदवीची माहिती संकलित केली आहे. यात संबंधीत शिक्षक एकतर बाहेरून बहिस्थ पध्दतीने महाविद्यालयात प्रवेश घेवून उन्हाळ्याची सुट्टी अथवा नियमित पध्दतीने महाविद्यालयात प्रवेश घेवून त्या ठिकाणी असणार्‍या 70 ते 80 टक्के हजेरी लावून बीएड अथवा पदवीचे शिक्षण पूर्ण केले असेल मात्र, हे करत असताना त्यांनी नियमित महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असल्यास त्यांनी संबंधीत शाळेत सुट्टी टाकलेली असणार. एकाच वेळी दोन्ही काम संबंधीत शिक्षक करू शकणार नाहीत.

मात्र, जिल्ह्यात असा प्रकार घडल्याच्या सशंय शिक्षण विभागाला आहे. यामुळे त्यांनी सेवेत असणार्‍या शिक्षकांनी कोणत्या कालावधीत बीएड् आणि पदवी घेतली आणि त्या काळात ते रजेवर होते की नाही, याची माहिती घेतली आहे. यात 133 शिक्षकांनी नियमितपणे बीएड आणि पदवी पूर्ण केलेली आहे. तर 125 शिक्षकांबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला संशय आहे. यासह 3 शिक्षकांनी रजा न घेता, तर 5 शिक्षकांच्या रजेच्या कालावधीत अनियमिता आढळली आहे.

आता शिक्षण विभागाने या शिक्षकांना नोटीस काढण्याचा निर्णय घेतला असून गटशिक्षणाधिकारी पातळीवरून या शिक्षकांना नोटीस देण्यात येणार असून तालुका पातळीवर त्यांच्या शाळेतील गैरहजेरी आणि बीएड आणि पदवीचे पूर्ण केलेल्या शिक्षणाचा कालावधीत तपासण्यात येणार आहेत. त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक करावाई करण्यात येणार आहेत. यात दोषी आढळणार्‍या संबंधीत शिक्षकांना बीएड आणि पदवीच्या जोरावर घेतलेल्या फायद्याला मुकण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com