‘पटसंख्येवर वेतन’ विरोधात शिक्षक परिषदेची नागपूरला 20 डिसेंबर रोजी आंदोलनाची घोषणा
Featured

‘पटसंख्येवर वेतन’ विरोधात शिक्षक परिषदेची नागपूरला 20 डिसेंबर रोजी आंदोलनाची घोषणा

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर शिक्षकांचे वेतन देण्याबाबत 4 डिसेंबरला सरकारने काढलेल्या आदेशाला राज्य शिक्षक परिषदेने तीव्र विरोध दर्शविला आहे. याविरोधात नागपूर हिवाळी अधिवेशन काळात 20 डिसेंबरला आंदोलनाची घोषणा करण्यात असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

या आंदोलनात जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानआप्पा साळुंखे, संजीवनीताई रायकर, बाबासाहेब काळे, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, महिला आघाडी राज्यप्रमुख पुजाताई चौधरी आदींनी केले आहे. शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या प्रश्नांवर आयुक्त विशाल सोळंकी यांनी अभ्यासगट नेमला होता. शिक्षणाशी संबंधित विविध विषयांच्या तब्बल 33 समित्यांची घोषणा परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. त्यात अधिकार्‍यांचे गट तयार केले आहेत.

यात शिक्षकांना वेतन अनुदान देण्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करण्यात आली होती. या संदर्भात समितीने अभ्यास करुन शिक्षकांना थेट वेतन अनुदान देण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार संस्था संचालकांना अनुदान देण्याबाबत अभ्यास करण्याची सूचना केली आहे. यामुळे शिक्षकांच्या वेतनावर टाच येणार आहे. ज्या वर्गात विद्यार्थी कमी त्या शिक्षकांचे वेतन देखील कमी होणार आहे. शिवाय ती रक्कम संस्थेकडे वर्ग होणार असून, त्याच रकमेतून शाळा चालवायची आहे. ही अतिशय भयंकर पद्धत राबवण्यासाठी मागील भाजप सरकारने आदेश दिलेले होते. राज्यातील अनुदानीत व सरकारी शिक्षण पद्धती उद्धवस्त करण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.

आंदोलनात जिल्ह्यातून शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, प्रा. सुनील पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, प्रा. सुनील सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, प्रा. श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, निलेश बांगर, नितीन म्हस्के, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे आदी सहभागी होणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com