Friday, April 26, 2024
Homeनगरकर वसुलीच्या कामातही राजकीय हस्तक्षेप

कर वसुलीच्या कामातही राजकीय हस्तक्षेप

महापालिका प्रशासन हवालदिल : कर्मचार्‍यांनाही नोटीस काढून तंबी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या कर वसुलीमध्ये कठोर कारवाई सुरू केल्यामुळे एकीकडे वसुलीचे प्रमाण वाढत असतानाच आता कठोर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी महापालिका कर्मचार्‍यांनाही त्यांच्या मालमत्तेचा कर 15 दिवसांत जमा करण्याची नोटीस दिली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या थकीत कराची रक्कम जवळपास 285 कोटींच्या घरात आहे. त्यातील काही रक्कम न्यायप्रविष्ट आहे. मात्र न्यायप्रविष्ट नसलेल्या कराची रक्कम देखील मोठी आहे. त्याच्या वसुलीसाठी यापूर्वी शास्तीमाफीसारख्या योजना आणण्यात आल्या. मात्र वसुली होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कर्मचार्‍यांनी जप्ती, नळजोड तोडणे अशी कारवाई हाती घेतली. शहरातील व्यावसायिकांकडे विशेषतः गाळेधारकांकडे मोठ्याप्रमामात थकीत रक्कम आहे. अनेकदा नोटिसा देऊनही गाळे धारकांकडून कर जमा केला जात नाही. मात्र महापालिकेने आता जप्तीची कारवाई हाती घेतल्याने गाळेधारकांमध्ये घबराट आहे. त्यांनी महापालिकेसमवेत चर्चा करण्याऐवजी थेट राजकारण्यांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे.

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे त्यांनी राजकारण्यांना घालायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राजकारण्यांनीही यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. गाळेधारकांना हप्ते पाडून देण्याचे सांगण्यात आले. यापूर्वी गाळेधारकांनी दरमहा 15 हजार रुपये जमा करण्याचे मान्य केले होते. त्यापैकी अनेकांनी ते पाळले नाही. पुन्हा हप्ते पाडून दिल्यानंतर त्याची नियमित अंमलबजावणी होईलच, याची खात्री प्रशासनाला नाही. मात्र गाळेधारकांवर कठोर कारवाई केल्यास इतर कोणत्याही कारणावरून महापालिकेवर मोर्चा आणणे, अधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या देणे असे प्रकार होण्याचीही शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. प्रशासनाने कठोर भूमिका कायम ठेवल्यास महापालिकेत आंदोलने झाले तर नवल वाटायला नको.

दुसरीकडे कर वसुलीची मोहीम तीव्र करताना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त द्विवेदी यांनी महापालिका कर्मचार्‍यांनाही झटका दिला आहे. त्यांच्या मालकीच्या किंवा वारसाने मिळालेल्या किंवा वारसाच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा कर कर्मचार्‍यांनी जमा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत सर्व कर्मचार्‍यांनी आपल्याकडील मालमत्तांची माहिती आस्थापना विभागाकडे द्यावयाची आहे. त्या मालमत्तांवरील थकीत कर पंधरा दिवसात जमा करावयाचा आहे.

एकाचवेळी सर्व रक्कम जमा करणे शक्य नसल्यास वेतनातून त्याची कपात करण्यात येणार आहे. त्यासाठी किती रकमेचा हप्ता ठेवायचा, याची माहितीही कर्मचार्‍यांनी द्यावयाची आहे. झेंडीगेट प्रभाग समितीमध्ये कराची थकबाकी असलेले 130 कर्मचारी आहेत. एकाच समिती कार्यक्षेत्रात एवढे कर्मचारी असतील, तर इतर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील कर्मचार्‍यांची अवस्था काय आहे, याचीही माहिती संकलित करण्याचे आदेश द्विवेदी यांनी दिले आहेत.

कोचिंग क्लासच्या वर्गांना सील
बुरूडगाव रस्ता प्रभाग समितीअंतर्गत येणार्‍या ज्ञानसागर कोचिंग क्लासच्या बच्चुभाई पुजारा यांच्याकडे मालमत्ताकराची 15 लाख 37 हजार 469 रुपये अधिक शास्तीची रक्कम थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही कर जमा न केल्यामुळे या मालमत्तेच्या पाच खोल्यांना सील करण्यात आले. प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांच्या नेतृत्त्वाखाली एस. एस. पुंड़, व्ही. जी. जोशी, राजेंद्र म्हस्के, विजय चौरे यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या