करोना संकटातही राज्यातील साखर कारखाने देताहेत ‘एफआरपी’
Featured

करोना संकटातही राज्यातील साखर कारखाने देताहेत ‘एफआरपी’

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे – करोना संकटाचा फटका साखर उद्योगालाही बसला आहे. अतिरिक्त साखर आणि करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे साखर विक्री ठप्प होवूनही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत एफआरपीची 95 टक्के रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. 2019-20 गाळप हंगामात कारखान्यांनी शेतकर्‍यांकडून 549.98 लाख टन ऊस खरेदी केला होता. त्यानुसार एफआरपी चे 13,121.69 कोटी रुपये होतात. ज्यापैकी 12,548.30 कोटी रुपये 15 मे 2020 पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना दिले आहेत.

दरम्यान अतिरिक्त साखर साठ्याच्या समस्येतून सुटका करुन घेण्यासाठी कारखान्यांनी आता उसाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. करोना संकटामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला तरीही साखर कारखाने हिमतीने या संकटाचा सामना करत आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये केवळ एक साखर कारखाना सोडून इतर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 15 मे 2020 पर्यंत 60.87 लाख टन साखर उत्पादन झाले होते, तर गेल्या वर्षाच्या 2018-19 च्या हंगामात उत्पादीत 107.15 लाख टनाच्या तुलनेमध्ये जवळपास 46.3 लाख टन इतकी कमी आहे. सध्याच्या गाळप हंगामामध्ये, 145 कारखान्यांनी पूर्वीच आपले गाळप बंद केले आहे आणि केवळ 1 साखर कारखाना सुरु आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत गाळप हंगाम 30 एप्रिल 2019 लाच संपला होता. या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना करोनासह दुष्काळ आणि महापूराचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे साखर उत्पादन कमी झाले.

Deshdoot
www.deshdoot.com