ऊस वाहतुकदारांचा वाहतूक नियमांना कोलदांडा

jalgaon-digital
3 Min Read

विना परवाना वाहतूक; चालक अल्पवयीन; नगर-मनमाड महामार्ग बनला धोकेदायक

राहुरी (प्रतिनिधी)- वाढत्या वाहतुकीच्या भार पेलवताना नाकीनऊ आलेल्या नगर-मनमाड महामार्गावर आता डबल ट्रॉलीने ऊस वाहतूक वाढली असून वाहतूक नियमांना वाहनचालकांकडून कोलदांडा बसला आहे. त्यामुळे नगर-मनमाड महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. पर्यायाने नगर-मनमाड महामार्ग अत्यंत धोकेदायक बनला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 22 साखर कारखाने असून त्यातील काही कारखाने वगळता सुमारे 15 हून अधिक साखर कारखाने ऊस वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी यांचा वापर करतात. वाहनांना ऊस वाहतूक करताना काही नियमावली असणे गरजेचे आहे. परंतु कोणताही कारखाना या वाहनांना कोणत्याही प्रकारचे नियम सांगत नसावेत, असे दिसून येते. वाहतुकीचे अनेक नियम असतात. परंतु वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेफामपणे ऊस वाहतूक करतात. ऊस वाहतूक करणार्‍या वाहन चालकांकडून खालीलप्रमाणे नियमांचे उल्लंघन केले जाते.

ऊस वाहतूक करताना अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याकडे संबंधित कारखाना प्रशासन, पोलीस खाते आणि परिवहन अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले आहे. ऊस वाहतूक करणारे वाहन वाहनाच्या माल वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) ऊस भरून वाहतूक करतात. महामार्गावरून वाहनचालक अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवितात. या वाहनांना पाठीमागे कुठल्याही प्रकारची सुरक्षेबाबत काळजी घेतलेली नसते.

ट्रॅक्टरचालक दोन ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करतात. ट्रॅक्टरला ट्रेलरच्याऐवजी जुगाड वापरतात. वाहनचालक वाहन थांबविताना रस्त्याच्या मध्येच वाहन थांबवितात. त्यामुळे अपघाताला आयतेच निमंत्रण मिळते. अनेक वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. काही वाहनांवर तर चक्क अल्पवयीन चालक असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी ही वाहन रस्त्याच्या मध्येच उभी करताना सुरक्षेबाबत कसलीही काळजी घेतली जात नाही. ऊस वाहतूक करताना वाहनचालक अतिशय मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज करून वाहन चालवितात. त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होतात.

या त्रुटींकडे संबंधितांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. अशा अनेक प्रकारे हे वाहनचालक नियम पायदळी तुडवून वाहन चालवितात. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत.

ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लँप नसल्याने रात्री अनेक वाहनचालकांना पुढे ऊस वाहतूक करणारे वाहन आहे, याचा अंदाज येत नाही. म्हणून अपघात होत आहेत. तसेच रस्त्याच्या मध्येच हे वाहन उभे असतात व त्यांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लँप नसल्याने अपघात घडत आहेत. या ऊस वाहतूक करणार्‍या चालकांना संबंधितांनी तंबी देऊन वाहतूक नियमांचे धडे देण्याची मागणी होत आहे.

या बेशिस्त ऊस वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी मंडळाने व कार्यकारी संचालकांनी नियमावली तयार करून द्यावी व नियमावलीचे पालन न केल्यास कठोर कार्यवाही करावी. वाहनांमुळे अपघात झाल्यास शेतकर्‍याच्या उसाचे नुकसान होते. अपघातामुळे अनेकजण गंभीर जखमी होतात तसेच एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. अशा घटना सतत घडत आल्या आहेत. जर ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे अपघात झाल्यास वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल होतो. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या कारखाना प्रशासनास देखील जबाबदार धरून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा, म्हणजे अशाप्रकारे लोकांच्या जीविताशी चालणारा हा खेळ थांबेल व नियमाची सर्वांना जाणीव होईल, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सचिव राजेंद्र गुलाबराव बोरूडे यांनी सहकार मंत्री, साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *