महाराष्ट्रासह सात राज्यांत हवे कडक लॉकडाऊन – जागतिक आरोग्य संघटना
Featured

महाराष्ट्रासह सात राज्यांत हवे कडक लॉकडाऊन – जागतिक आरोग्य संघटना

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली – करोनाला रोखण्यासाठी देशात चौथा लॉकडाऊन 31 मे पर्यंत घेण्यात आला आहे. पण चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या काळात अनेक राज्यांनी मोठ्या प्रमाणात सुट दिल्याने, करोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

यात महाराष्ट्रासह सात राज्यांत करोना रुग्ण वाढीचे प्रमाण जास्त असून, या राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करायलाच हवे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, चंदीगड, तामिळनाडू आणि बिहार या राज्यांमध्ये लॉकडाऊनचे कठोर पालन करण्याची गरज आहे, असेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासात असे आढळले की, अमेरिकेतील 50 टक्के राज्यांमध्ये लॉकडाऊन काढला जाऊ शकतो. भारतातीलही काही राज्यांमध्ये नियम काही प्रमाणात शिथिल केले जाऊ शकतात. मात्र, महाराष्ट्रात 18 टक्के, गुजरातमध्ये 9 टक्के, दिल्लीत 7 टक्के, तेलंगणात 7 टक्के, चंदीगडमध्ये 6 टक्के, तामिळनाडूत 5 टक्के आणि बिहारमध्ये 5 टक्के करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या राज्यांमधील आकडेवारी आमच्या अंदाजानुसार फार जास्त असल्याने, तिथे लॉकडाऊनमध्ये कुठलीही सुट दिली जाऊ नये, असे आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.

भारताला करोनाच्या संसर्गावर मात करायची असेल, तर आमचा सल्ला गंभीरपणे विचारात घ्यावा लागणार आहे. कारण, या सात राज्यांमधील करोनाबाधितांची संख्या देशातील एकूण संख्येच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. या राज्यांमध्ये हॉटस्पॉटची संख्याही जास्त आहे, असेही या जागतिक संघटनेचे मत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com