राज्यात अडीच लाख शिक्षकांना निष्ठा प्रशिक्षण
Featured

राज्यात अडीच लाख शिक्षकांना निष्ठा प्रशिक्षण

Sarvmat Digital

अहमदनगर जिल्ह्यातील 12 हजार शिक्षकांचा समावेश

संगमनेर – देशातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावली जावी त्याकरिता शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्रात याची अंमलबजावणी 4 डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने 22 ऑगस्टला ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन स्कूल टीचर्स हेड होलिस्टिक अ‍ॅडव्हान्समेंट’ (निष्ठा) या प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली. यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचे राज्यस्तरीय तसेच तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणार्‍या सर्वच शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातील 5 तज्ज्ञाची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. यासाठीची निवड प्रक्रिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. तालुक्याला पाच साधन व्यक्तींसोबत एक राज्य साधन व्यक्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाच दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

निवडलेल्या शिक्षकांना राज्यस्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दोन भाषातज्ज्ञ, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र या विषयांचा प्रत्येकी एक असे पाच शिक्षक असतील. त्यांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण पुणे येथे होणार असून यात संवाद कौशल्येही शिकविली जाणार आहेत. यानंतर हे तज्ज्ञ तालुकास्तरावर प्रशिक्षण देतील, असे या आदेशात म्हटले आहे.

प्रशिक्षणात सूक्ष्म नियोजन
राज्य व तालुका स्तरावरील प्रशिक्षणादरम्यान अत्यंत स्वरूपाचे नियोजन करण्याचे आदेश संचालकांनी दिले आहेत. प्रत्येक तालुका, जिल्हास्तरावर एक तज्ज्ञ समिती असेल. जी या सर्व प्रशिक्षणावर तसेच प्रशिक्षणानंतर येणार्‍या अडचणी सोडविण्यात शिक्षकांना सहाकार्य करेल, तर त्यांच्यावर राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती असेल. प्रशिक्षण देणे सुलभ व्हावे या उद्देशाने असे विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान तालुकास्तरावर प्रत्येक शिक्षकांना पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शकाना देखील देखील प्रशिक्षण पाच दिवसांचे असणार आहे.

गुणवत्तेकरिता होईल फायदा
शिक्षणातील नवीन प्रवाहामुळे शिक्षकांचे अध्यापन अधिक परिणामकारक होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहे. वर्गातील आंतरक्रिया बरोबरच अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण परिणाम साधेल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना गुणवत्ता उंचावण्यासाठी होईल. त्यातून शिक्षकांचे अध्यापन प्रभावी व परिणामकारक होईल. अनेक संकल्पना समजावून घेण्यास शिक्षकांना याची मदत होणार आहे. 100 टक्के शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांसाठी एका शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दुसर्‍या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-रमाकांत काठमोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर

राज्यात सुमारे अडीच लाख शिक्षकांना प्रशिक्षण
देशातील सर्व शिक्षकांना एकाच वेळेस प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. 4 डिसेंबरपासून कार्यक्रमांतर्गत राज्यात 2 लाख 40 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी 6 तज्ज्ञ मार्गदर्शक निर्माण केले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, आरोग्य व योगा, ग्रंथालय, युवा क्लब, शालेय नेतृत्त्व गुणवैशिष्टये, किचन गार्डन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

अहमदनगर जिल्ह्यात 12 हजार शिक्षकांना प्रशिक्षण
देशभरात प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणार्‍या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 12,147 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकोले तालुका 1247, जामखेड 547, कर्जत 825, कोपरगाव 683, अहमदनगर महानगरपालिका 128 अहमदनगर तालुका 835, नेवासा तालुका 1004, पार्लर 922 ,पाथर्डी 890, राहता 609, राहुरी 850 ,संगमनेर 1261, शेवगाव 743 ,श्रीगोंदा 1085, श्रीरामपूर 522, अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा प्राथमिक 10 हजार 763, तर उच्च प्राथमिक 1384 शिक्षकांचा समावेश असणार आहे.
– डॉ. अचला जडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर.

  • देशात 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण
  • राज्यात अडीच लाख प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण
  • 4 डिसेंबर पासून राज्यतज्ज्ञासाठी प्रशिक्षण
  • उर्वरित शिक्षकांना तालुकास्तरावर प्रशिक्षण
  • प्रत्येक शिक्षकाला पाच दिवसाचे असणार प्रशिक्षण
  • या कालावधीत इतर प्रशिक्षण घेण्यास प्रतिबंध
  • प्रशिक्षणाचे प्रभावी व परिणामकारक प्रशिक्षणासाठी
  • अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न
  • एकावेळी फक्त 120 ते 150 शिक्षकांचे प्रशिक्षण
Deshdoot
www.deshdoot.com