दहावीचा पेपर रद्द; पण निकाल उशीराच?
Featured

दहावीचा पेपर रद्द; पण निकाल उशीराच?

Dhananjay Shinde

मुंबई – कोरोनामुळे दहावीचा भूगोल विषयाची परीक्षा रद्द करत राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र, लॉकडाऊनमुळे पेपर शिक्षकांपर्यंत पोहोचलेच नसल्याने निकालाला उशीरच होणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. याचा परिणाम अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवरही होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर रद्द केल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक तणावमुक्त झाले आहेत. परंतु कोरोना संकटामुळे दहावीच्या परीक्षा पेपरचे मूल्यमापन पूर्णपणे झालेले नाही.

लॉकडाऊनमुळे परीक्षकांपर्यंत अद्याप पेपर पोहचलेले नाहीत. पेपरचे गठ्ठे हे अद्यापही नियंत्रण कक्षामध्येच आहेत. तसेच परीक्षकांनी तपासलेले पेपर हे त्यांच्याकडेच पडून आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे तीन टप्प्यात तपासले जातात. प्रथम परिक्षकांकडून पेपर तपासण्यात येतात. परीक्षकांनी तपासलेले पेपर नियामक व नंतर मुख्य नियामकाकडे जातात. परंतु राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे परिक्षकांनी तपासलेले पेपर अद्यापही परिक्षकांकडेच पडून आहेत. तर अनेक शिक्षकांपर्यंत पेपर पोहोचलेच नाहीत. त्यातच राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने आता दहावीच्या पेपर मूल्यांकनाचे काम रखडण्याची शक्यता शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढल्याने दहावीच्या भूगोलाचा पेपर रद्द करत शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थी व पालकांना दिलासा दिला असला तरी, पेपर शिक्षकांपर्यंत पोहोचलेच नसल्याने मूल्यांकनाच्या कामाला विलंब होऊन निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com