बोगसगिरी थांबविण्यासाठी संघटनेच्या मागणीला ऑनलाईनचा ‘उतारा’
Featured

बोगसगिरी थांबविण्यासाठी संघटनेच्या मागणीला ऑनलाईनचा ‘उतारा’

Sarvmat Digital

क्रीडा शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे क्रीडा आयुक्तांचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा संघटनांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार क्रीडा स्पर्धांचे आयोजन, स्पर्धा अनुदान व प्रमाणपत्र व्हेरीफिकेशन ऑनलाईन करण्यासोबतच शालेय स्पर्धेसंदर्भात क्रीडा शिक्षक व विद्यार्थी यांना येणार्‍या अडचणी भोजन व निवास व्यवस्था, स्पर्धा आयोजन निधी, पंच, मानधन, खेळाडू भत्ता निधीत वाढ, खेळाडू अपघात विमा लागू करणे, ग्रामीण क्रीडा स्पर्धा व महिला क्रीडा स्पर्धा गट नव्याने चालू करणे, रेल्वे व एसटी बस आरक्षण सवलत, क्रीडा अनुदान योजना व प्रमाणपत्र व्हेरीफिकेशन प्रक्रिया ऑनलाईन करणे, शाळा तेथे क्रीडा शिक्षक असावा, उत्कृष्ट कामगिरीबाबत अतिरिक्त वेतनवाढ मिळावी, शिक्षक प्रशिक्षण आदी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती व शारीरिक शिक्षण संघटनांच्या प्रश्‍नासंदर्भात क्रीडा आयुक्त बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, सहाय्यक संचालक सुधीर मोरे, सहसंचालक सुहास पाटील, उपसंचालक माणिकराव ठोसरे, उपसंचालक आनंद व्यंकेश्‍वर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, अरुण पाटील यांच्या उपस्थितीत पुणे येथील बालेवाडीला बैठक झाली.

फीट इंडियाप्रमाणे महाराष्ट्रात खेळाडूंसोबतच शिक्षक व सर्व विद्यार्थी फीट राहण्यासाठी क्रीडा विभागामार्फत अभियान राबविण्यात येणार आहे. याच्या निवड चाचणीत पारदर्शकता आणण्यासाठी खेळाडूंची फिटनेस चाचणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. शारीरिक शिक्षण शिक्षक हा क्रीडा विभागाचा कणा आहे. त्याच्या सहकार्याशिवाय मार्गक्रमण अशक्य असून त्याचा मानसन्मान राखत क्रीडा विभागाच्या समस्या प्राधान्याने सोडवून शिक्षण आयुक्तांकडे एकत्रित मिटींग करून सर्व समस्यांबाबत त्वरेने निराकरण करण्याचे आश्‍वासन राज्य क्रीडा आयुक्त बकोरीया यांनी दिले. संघटनेने वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार क्रीडा योजना, स्पर्धा अनुदान व प्रमाणपत्र व्हेरीफिकेशन ऑनलाईन करण्याची मागणी बैठकीत मान्य केली.

यावेळी राजेंद्र कोतकर (नगर), विश्‍वनाथ पाटोळे (पुणे), शिवदत ढवळे (अमरावती), ज्ञानेश काळे (सातारा), संजय पाटील (नाशिक), आनंद पवार (धुळे), आर.वाय.जाधव, राजेंद्र पवार, प्रमोद राऊत (सातारा), बयाजी बुराण, दत्ताञय मारकड (सिंधुदुर्ग), सचिन देशमुख (नागपूर), बी.डी. जाधव (नांदेड), जालिंदर आवारी, उत्तम जावळे, प्रतिभा गाडेकर, सुवर्णा घोलप, ज्ञानेश्‍वरी लोखंडे, शरद इसकांडे, संजय होळकर, राजेंद्र खोमणे (पुणे), निवृत्ती काळभोर, निळकंठ कांबळे (पिंपरी चिचवड) हे सदस्य उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com