केरळात मान्सूनची धडक
Featured

केरळात मान्सूनची धडक

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली – भारतात मान्सूनने हजेरी लावली आहे. केरळ किनारपट्टीवर रविवारी रात्री मान्सूनने धडक दिली. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी ही माहिती दिली आहे. भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात 75 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने याआधी 1 जूनला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाटयाच्या वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. तसेच 2 जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. 3 आणि 4 जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, प्रामुख्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होईल. पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com