आयडीया कॉलेजचे संचालक सोहोनी यांना ‘मासा’चा जीवनगौरव पुरस्कार
Featured

आयडीया कॉलेजचे संचालक सोहोनी यांना ‘मासा’चा जीवनगौरव पुरस्कार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

शिक्षण क्षेत्रात पहील्यांदाच उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकचा बहुमान

नाशिक | प्रतिनिधी

विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेजचे माजी प्राचार्य, संचालक असलेल्या प्रा. आर्किटेक्ट विजय श्रीकृष्ण सोहोनी यांना ‘मासा’ (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ आर्किटेक्चर) ने सुर्वणपदक प्रदान करत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावेळी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए)चे अध्यक्ष असलेल्या आर्किटेक्ट हबीब खान यांच्या विशेष उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या सोहळ्याला सोहोनी यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आर्किटेक्चर क्षेत्रातला हा अतिशय मानाचा पुरस्कार आहे. सोहोनी यांच्या रूपाने पहील्यांदाच उत्तर महाराष्ट्रला मान मिळाला असून नाशिकच्या शिक्षण क्षेत्राचाही बहुमान झाला आहे. सोहोनी यांनी आर्किटेक्चरच्या शिक्षणात दिलेल्या भरीव आणि महत्वपूर्ण अशा योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

तीस वर्षांहून अधिक काळ आर्किटेक्चर शिक्षणात सोहोनी कार्यरत आहे. आयडीया कॉलेजच्या माध्यमातून काम करत असतांना आर्किटेक्चर विषयाला पर्यावरणपूरक बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी व्हर्टिकल स्टुड‌िओ, विविध प्रदर्शने, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, संशोधनातून प्रत्यक्ष मॉडेल्सची उभारणी यांना चालना दिली. याआधी २००४ मध्ये कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर च्या राष्ट्रीय अध्यक्ष त्यांची झालेली निवड नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरली.

आपल्या आठ वर्षांच्या अध्यक्षीय काळात त्यांनी अनेक कामे केली. त्यात या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्यात ‘नियासा’ हे या क्षेत्रातील संशोधनासाठीचे केंद्र त्यांच्या काळात उभे राहिले. कौन्सिलच्या कामाचे डिजिटलायझेशन करून विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील ‘नाटा’ ही स्पर्धा त्यांनी सुरू केली.

संघटनात्मक पातळीवर भरीव काम करीत असतानाच त्यांनी २००६ मध्ये गोव्यात विद्यावर्धन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन्व्हायर्नमेन्ट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर (आयडिया) कॉलेजची स्थापना केली. २०११ मध्ये हे महाविद्यालय नाशिकला स्थलांतरीत केले. २०१६ साली महाविद्यालयाने स्वत:च्या प्रशस्त आणि आधुनिक आणि पर्यावरणपूरक वास्तूमध्ये स्थलांतर केले. नवीन वास्तूमध्ये सर्व पायाभूत सुविधा, पेपरलेस कामकाज, संगणकीकृत वर्ग, तज्ज्ञ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद अशा महत्त्वपूर्ण गोष्टींच्या आधारावर कॉलेजची पुढची वाटचाल सुरू केली.

सुरुवातीला सोहोनी यांनी जे. जे.स्कूलमध्ये १९६८-७२ दरम्यान शिक्षण घेऊन आर्किटेक्चर विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर १९८४ मध्ये मास्टर्स डिग्री संपादन केली. त्यावेळी नाशिकमध्ये या विषयात तज्ञ असलेले ते एकमेव होते. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने सुरू केलेल्या आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com