श्रीरामपुरात ‘सेतू’मध्ये नागरिकांची लूट !
Featured

श्रीरामपुरात ‘सेतू’मध्ये नागरिकांची लूट !

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शंभर रुपयांचा स्टँप 110 रुपयांना, साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र 120 रुपयांना, प्रतिज्ञापत्रावरील फोटोसाठी 50 रुपये, अशा एक ना अनेक प्रकारे सेतू व स्टँप व्हेंडर सामान्य माणसाला दिवसा खुलेआम लुटत आहे. कागदाची गरज म्हणून ही लूट निमूटपणे सहन करावी लागते. हा प्रकार श्रीरामपूर तहसील कचेरी परिसरात सुरु आहे.

तालुका पोलीस स्टेशन समोरील तसेच इतर सेतू कार्यालयात हा प्रकार पाहावयास मिळाला. सामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा उठविला जात आहे. याला खतपाणी घालण्याचे काम खर तर बँका, महसूल विभागाकडून होत आहे. रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, अंध अपंग योजना, हरवलेले बँक पासबुक आदींसह अनेक कागदपत्रासाठी प्रतिज्ञापत्र, अर्ज, फोटो याची सक्ती केली जाते.

बहुतांशी नागरिकांना कागदपत्राची माहिती नसते. सेतूचा धंदा होण्यासाठी अर्ज इथून टाईप करा, मग फोटो इथे काढा मग प्रतिज्ञापत्र करतो. यातच नागरीक वैतागतात. प्रत्येक ठिकाणी 100-200 रुपये घेतात, 100 रुपयांचा स्टँम्प घेतला तर स्टँम्प देणारा 110 रुपये घेतो. दुय्यम निबंधक यांनी या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. किती पैसे घ्यायचे याचे बंधन घालून दिलेले नाही.

प्रतिज्ञापत्रावर सही कोण करणार ?
सगळ्यात वाईट अनुभव तहसील कचेरीत गेल्यावर येतो. प्रतिज्ञापत्रावर सही कोणी करायची याची यादी आहे. ज्याचे नाव तेच सही करणार. दुसरे सही करणार नाहीत. पण सही करायला जागेवर कोणी सापडत नाहीत. चहाला गेल्यावर तास दोन तास घालवतात, नागरिकांनी विचारले तर नीट उत्तर मिळत नाही. हा अनुभव काल (शनिवार) अनेकांना आला. चौकशी केली असता तहसीलदार नगरला मीटिंगला गेल्याने हा सावळागोंधळ सुरु असल्याचे समजले.

दक्षता घेणार…
नगरला मीटिंग होती. प्रतिज्ञापत्रावर मी पण सह्या करतो. सह्या करण्याचे सर्वाना अधिकार दिले आहेत. मीटिंगमध्ये तशा सूचना दिल्या. प्रतिज्ञापत्रावर सह्या साठी नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
-प्रशांत पाटील, तहसीलदार,श्रीरामपूर.

Deshdoot
www.deshdoot.com