Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीगोंद्यात अनधिकृत सावकारांचे फुटले पेव

श्रीगोंद्यात अनधिकृत सावकारांचे फुटले पेव

महिन्याला 15 ते 20 टक्के वसुली

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा गाव तसे निमशहरी असल्याने फारसे उद्योग, व्यवसाय नसले तरी नौकरदार, छोटे व्यावसायिक आणि शेतकरी असलेल्या श्रीगोंद्यात सध्या अनधिकृत सावकाराचे पेव फुटले असून ज्यांना बँका, पतसंस्थांमध्ये कर्ज मिळत नाही असे अनेक तरुण आपल्या गरजा भागवण्यासाठी या अनधिकृत सावकारांच्या दारात व्याजाने पैसे घेण्यासाठी मध्यस्था मार्फत जात आहेत. ही अनधिकृत सावकारकी करणारे तथाकथित राजकीय वलय असलेले पुढारपण करत असून त्यांच्याविरोधात तक्रारी होत नसल्याने अव्वाच्या सव्वा व्याज चुकते करणारे अनेक जण शहरात व्यथित जीवन जगत आहेत.

- Advertisement -

श्रीगोंदा शहरात मोठे उद्योग, व्यवसाय नाहीत. कुठली औद्योगिक वसाहत नसल्याने सर्वच तरुणाच्या हाताला काही काम मिळत नाही. शहरातून शेजारी शिरूर, पुणे, दौंडकडे कामासाठी जावे लागते. सर्वच जणांना हे शक्य नसल्याने शहरात अनेक तरुण छोटे मोठे व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी अनेक वेळा बँक, पतसंस्थांकडे कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज काहींना उपलब्ध होते; मात्र अनेक जणांना कुठली पत नसल्याने सहज कर्ज उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती असल्याने आपली गरज पूर्ण करण्यासाठी कुणापुढे तरी हाथ पसरावे लागत असतात.

शहरात अशाच प्रकारे व्यावसायिक, कामगार, नोकरदार, शेतकरी, बेरोजगार तरुण यांपैकी अनेकांना आर्थिक गरज पडते. अशा वेळी त्यांचा आर्थिक प्रश्न बँक, पतसंस्था मधून सुटत असली तरी सगळ्यांना कर्ज मिळतेच असे नाही. यापुढे जाऊन ऐनवेळी कुणी कर्ज देते असेही नसल्याने तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी अनेक वेळा खाजगी सावकारांच्या दारात जावे लागते.

शहरात असे कर्ज देणारे अनेक जण आहेत. त्यांच्याकडे कुठला परवाना नाही; मात्र ऐन वेळी कुणाच्या तरी मध्यस्थीने पैसे दिले जात असले तरी एक महिन्यासाठी 15 ते 20 टक्के याप्रमाणे सावकार पैसे देत आहेत. कर्जापेक्षा व्याज जास्त होत असल्याने अनेक तरुण या ओझ्याखाली दबले आहेत.

इथे करा तक्रार
शहरात अनेक जण बेकायदेशीर सावकाराच्या ओझ्याखाली दबले असून वेळेत घेतलेले पैसे देता आले नसल्याने वेळप्रसंगी त्यांच्याकडून घेतलेले धनादेश बँकेत भरून ते परत आल्यावर अनेकांना कोर्टात खेचले जात आहे. अशा ओझ्याखाली दबलेल्यानी सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तसच पोलीस स्टेशनला आपली कैफियत पुराव्यानिशी द्यावी.

कर्जापेक्षा व्याज झाले डोईजड
शहरात अडीचणीच्या वेळी घेतलेले अनधिकृत सावकाराचे पैसे वेळेत परत देता न आल्याने या पैशाचे व्याज हे मुद्दलाच्या दुप्पट होत असून हे पैसे फेडता आले नसल्याने अनेक जण तरुण तणावात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या