श्रीगोंदा: वर्ग-3 च्या जमिनीवर बोगस कर्जवाटप
Featured

श्रीगोंदा: वर्ग-3 च्या जमिनीवर बोगस कर्जवाटप

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेने सन 2010 सालातील विद्यमान चेअरमन व त्यावेळेपासून सध्या कार्यरत असलेल्या संचालक व संस्थेच्या सचिवाने बोगस कागदपत्रे व जिल्हा बँकेला अंधारात ठेऊन कार्यक्षेत्रात नसूनही शिरसगाव बोडखा येथील गट नं-38, 59 या इनाम वर्ग-3 च्या देवस्थान जमिनीवर दीर्घ मुदत(गृहकर्ज),मध्यम मुदत व पीक कर्ज अशा प्रकारची लाखो रुपयांची बोगस कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सदर संचालकांनी 2010 साली नातेवाईक अध्यक्ष व स्वतः संचालक असताना स्वतः साठी व आपल्या चार भावांच्या पाच बंगल्यांसाठी गृहकर्ज घेतले. सदर जमीन श्रीगोंदा येथील श्रीराम मंदिर देवस्थानची शिरसगाव बोडखा येथील आहे. खंडकरी म्हणून सदर संचालक ही जमीन पूर्वी कसत होते. मूळ मंदिराचे ट्रस्टी हे ठाणे व पुणे येथे वास्तव्यास आहेत. जमीन ताब्यात घेण्यासाठी दीर्घ काळापासून न्यायालयीन लढा चालू आहे. ट्रस्टचे अध्यक्ष 1965 साली मयत झाल्याने त्यांच्या वारसदारांनी न्यायालयीन लढाई जिंकली व सदर खंडकर्‍यांची नावे निकालात कमी झाली. म्हणून ट्रस्टच्या वारसदारांनी 31/8/2013 रोजी जिल्हा बँक व सेवा संस्थेला अर्ज करून या लोकांचा कर्जपुरवठा व कर्ज नवे-जुने करणे थांबविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

परंतु सदर कर्जदारांची नावे न्यायालयीन निकालामुळे 2013 सालीच सात-बारा उतार्‍यावरून े कमी झाली आहेत. तरीही कर्जदार संचालक असल्याने पदाचा गैरवापर करून व तत्कालीन सचिवाला व बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून सुमारे साठ लाखांचे वेगवेगळ्या कारणाने कर्ज घेतले. यासंदर्भात जिल्हा बँकेकडून कर्जाची मागील बाकी भरा व नव्याने कर्ज घ्या असे प्रकार चालूच आहेत. सदर संचालकाने पुन्हा सदर देवस्थान जमिनीचे खोटे दस्तावेज बनवून 2017 साली श्रीगोंदा दुय्यम निबंधक व महसूल कर्मचारी यांना हाताशी धरून बोगस खरेदी करून जमीन स्वतःच्या व कुटुंबातील व्यक्तींच्या नावे करून घेतली आहे. तब्बल पाच वर्षे उतार्‍यावरून नाव कमी होऊनही पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज तत्कालीन सचिव व सेवा संस्था अध्यक्षाला हाताशी धरून कर्जप्रकरणे आजपर्यंत अव्याहत चालू आहेत.

याप्रकरणी संस्थेचे सभासद अंबादास सोनबा मांडे यांनी सखोल चौकशीची तसेच बँकेची अधिकारी तसेच महसूल व दुय्यम निबंधक अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

आमच्याकडे या विषयावर असंख्य तक्रारी आल्या. दीड वर्षांपासून सदर प्रकरणाची बँक पातळीवर चौकशी चालू आहे. दोषींवर योग्य ती कारवाई करू.
भरत इथापे- तालुका विकास अधिकारी , जिल्हा बँक

Deshdoot
www.deshdoot.com