शिवभोजन पुढील तीन महिने 5 रुपयांत – मुख्यमंत्र्यांची घोषणा

सार्वमत

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील तीन महिने शिवभोजन दहा रुपयांवरून 5 रुपयांवर आणल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.
त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. जनतेने घरात राहून दाखवलेल्या संयमाबाबत त्यांनी धन्यवाद मानले. तसेच ही आरोग्याची आणीबाणी आहे. त्यामुळे अजिबात वर्दळ करू नका आणि सरकारला कठोर पावलं उचलायला लावू नका, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार तुमची मदत करतंय तर तुम्हीही सरकारला मदत करा. आपण या आजारावर जिंकणारच हा आत्मविश्वास माझ्यात आहे, तो तुमच्यातही ठेवा आणि घरात थांबा, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सध्या अशी परिस्थिती आहे की कोणताच देश कोणाला उपयोगी येणार नाही. मात्र आपली चांगली टीम तयार झाली आहे. तिन्ही पक्षातील नेते काम करतच आहेत, मात्र विरोधी पक्षातील नेते आणि राजही माझ्या संपर्कात आहे. ते मला सूचना करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी माझं बोलणं सुरू आहे, त्यामुळे आपली चांगली टीम तयार झालेली आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्येच वेगळं अकाऊंट तयार केलेलं आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती त्यात पुढाकार घेतायेत. उद्योगपती कोटक यांनी 10 कोटींची मदत दिली आहे. तर विराटही यात मागे नाही.

तसेच इतर राज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात आहेत. त्यांनी सध्या जिथे आहात तिथेच थांबावे. महाराष्ट्र सरकार तुमची संपूर्ण जबाबदारी घेईल, मात्र काहीतरी चुकीचं होईल, असं कोणतंही पाऊल उचलू नका. तर सर्व कारखान्यांच्या मालकांनी आपल्या कर्मचार्‍यांनी जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यासह शिवभोजन थाळीची सध्या 163 ठिकाणी केंद्र आहेत. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र सुरू होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

‘कस्तुरबा आणि नायडू रुग्णालयातील डॉक्टरांच्या मी संपर्कात आहे. त्यांच्याशी बोलून माझं मनोधैर्य वाढतंय. तुम्हाला आज रविवारची आणि पुढील काही दिवस जबरदस्तीची सुट्टी आहे, मात्र डॉक्टरांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागतंय. मी सर्व डॉक्टरांना विंनती करतो की, तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णामध्ये निमोनियाची किंवा सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी करा, तो कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याला पुढील तपासणीसाठी पाठवा. हा आजार पहिल्या पायरीवर थांबवला तरच तो पुढे जाणार नाही.’ असेही ते म्हणाले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *