Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डीतून एका वर्षात नव्वद जण बेपत्ता!

शिर्डीतून एका वर्षात नव्वद जण बेपत्ता!

साईभक्त आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पोलीस तपास यंत्रणा संशयाच्या भोवर्‍यात

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डीतून एका वर्षात चक्क नव्वद जण गायब झाल्याची माहिती इंदोर येथील एका साईभक्ताने माहिती अधिकारातून उघडकीस आणली असून याबाबत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावर औरंगाबाद खंडपिठाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तसेच शिर्डी पोलीस स्टेशन यांना जबाबदार धरून 10 जानेवारी 2020 पर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

देश विदेशातून दररोज लाखो भक्त शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणावरून अनेक साईभक्त बेपत्ता झाल्याच्या तक्रारी शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहे. असे असूनही शहर भाविकांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल इंदोर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान इंदोर येथील साईभक्त मनोजकुमार सोनी हे 2017 मध्ये आपल्या पत्नी बरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. तेंव्हापासून त्यांची पत्नी शिर्डीतून बेपत्ता झाली म्हणून त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार रजिस्टर नोंद केली होती. मात्र आजपावेतो 2019 पर्यंत त्यांची पत्नी मिळून आलेली नाही.

निराश आणि हतबल झालेले मनोजकुमार सोनी यांनी 2017 ते 2018 या कालावधीत शिर्डीतून बेपत्ता झालेल्या तक्रारीची माहिती माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली होती. ती त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली असून एका वर्षात शिर्डी शहरातून तब्बल नव्वद जण बेपत्ता असून यात जास्त महिला आणि लहान मुले-मुलींचा समावेश असल्याचे माहितीतून समजले आहे. यात त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे.

सोनी यांनी पोलिसांकडे वारंवार जाऊनही तपास जैसे थे असल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोलिसांच्या कामगिरी विरोधात आव्हान दिले होते. औरंगाबाद खंडपिठाचे ज्येष्ठ विधीज्ञ पंकज दीक्षित यांनी न्यायालयासमोर हा गंभीर प्रकार सांगून न्यायालयात आपली बाजू मांडली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी सर्व बाबींना जबाबदार असणार्‍या पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त करून पोलीस अधीक्षक यांना आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांना जबाबदार धरून त्यांनी 10 जानेवारी 2020 पर्यंत सर्व अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

अनेकवेळा बेपत्ता, चोरी, पाकिटमारी, मारहाण लूट याविषयी शिर्डी पोलीस ठाण्यात भक्त तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलीस वेळकाढूपणा करतात. त्यामुळेच या सर्व रॅकेटमागे पोलिसांचा हात असू शकतो, अशी शंका उपस्थित होणे साहजिकच आहे. तसेच परराज्यातील वाहतूक पोलिसांच्या व्यवसायातील टोळी भाविकांची लूटमार करत असून याची उच्चस्तरीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी होणे आवश्यक आहे.
– संजय काळे, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -

ताज्या बातम्या