संचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक
Featured

संचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहरातील साक्री रोडवरील जे.के. ठाकरे हॉस्पिटल चौकात संचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली असून मद्य प्राशन करणार्‍या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना शहरातील साक्री रोडवरील जे.के. ठाकरे हॉस्पिटल चौकात दारू विक्री होते असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता तेथे सुधाकर निळकंठ सावंत (वय 45) याच्यासह तीन जण आढळून आले.

त्यांच्याकडून 5 हजार 100 रूपयांची रॉयल स्टॅग दारूच्या 30 बाटल्या, 1050 रूपयांच्या रॉयल चॅलेंजच्या 5 बाटल्या, 2 हजार 496 रूपये किंमतीच्या देशी दारूच्या 48 बाटल्या व 15 हजारांची दुचाकी असा 23 हजार 646 रूपयांचा मुद्येमाल आढळून आला.

याबाबत सावंत याच्याकडे चौकशी केली असता त्याने देशी दारूच्या बाटल्या हॉटेल शांतीसागर व विदेशी दारूच्या बाटल्या हॉटेल जय येथून आणल्याचे सांगितले. त्यावरून दोन्ही हॉटेलवर पथकाने छापा टाकला असता तेथे नंदकिशोर केशव मोरे, जयदीश सुवालाल प्रजापती, अमोल संतोष पाटील, अभिजीत विष्णु भोसकर हे दारू पितांना आढळून आले. याबाबत पोना प्रल्हाद सुखदेव वाघ यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुधाकर सावंत, किशोर रघुनाथ कोळी आणि प्रदीप पुरणदास बैरागी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पथकातील असई हिरालाल बैरागी, एन.एस. आखाडे, पोसई व्ही.पी.पवार, पोहेकाँ भिकाजी पाटील, पोना मुख्तार मन्सुरी, पोकॉ पंकज खैरमोडे, कमलेश सुर्यवंशी, विवेक साळुंखे, राहुल गिरी यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com