संगमनेर : चढ्याभावाने  विक्री ; दुकानांची तपासणी
Featured

संगमनेर : चढ्याभावाने विक्री ; दुकानांची तपासणी

Dhananjay Shinde

 सार्वमत

संगमनेर (प्रतिनिधी) – कृत्रिम भाववाढ आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून दुकानांची तपासणी प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. चढ्याभावाच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्याने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी शनिवारी परिपत्रक जारी करुन चढ्याभावाने वस्तू विक्री करणार्‍यांना इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त दैनिक सार्वमत मध्ये प्रकाशित झाले. कालपासून प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे.

भारत शासन आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केलेली असली तरी या मधून जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद केलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे विक्री व वितरण सुरळीत राहावे याकरिता प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत परंतु काही अपप्रवृत्तीचे व्यक्ती अशा वेळी गैरफायदा घेऊन कृत्रिम भाववाढ व कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने रविवारपासून संगमनेर आणि अकोले तालुक्यातील किराणा दुकान तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे व्यापार्‍यांच्या दुकानांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे.

या तपासणीमध्ये कुठेही भाव वाढ करून वस्तूची विक्री अतिरिक्त दराने करण्यात येत असल्याचे किंवा साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तरी सर्वसामान्य नागरिकांनी कृपया कुठेही अतिरिक्त पैसे अदा करू नये, कोणी व्यापारी भाव वाढ करून नफेखोरी करीत असल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्यात यावी तसेच कुठे साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याबाबत देखील नागरिकांनी प्रशासनात माहिती द्यावी जेणेकरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करता येईल, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी केले आहे.

अनेक किराणा व्यापारी तसेच भाजीपाला व्यापारी चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करून कृत्रिम भाववाढ करून नफेखोरी करत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत.तरी सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी आपापल्या भागातील किराणा दुकानांची तपासणी करून सदरचे व्यापारी योग्य भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असल्याची खात्री करावी, यासाठी प्रत्येक व्यापार्‍याने त्याच्या दुकानाच्या दर्शनी भागात जीवनावश्यक वस्तूंचे दर लिहिलेले आहेत याची खात्री करून घ्यावी, तसेच छापिल किमतीवर विक्री केल्या जात असल्याची खात्री ग्राहकांकडून करून घ्यावी, ज्याठिकाणी चढ्या भावाने वस्तूंची विक्री होत असल्याचे आढळले तर तात्काळ अहवाल सादर करावा, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची नफेखोरी आणि साठेबाजी होणार नाही यादृष्टीने सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी आपल्या गावातील नागरिकांना देखील सजग राहण्यासाठी प्रयत्न करावेत.
-डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, संगमनेर

Deshdoot
www.deshdoot.com