नगरच्या बाजारपेठेत शुकशुकाट
नगरच्या बाजारपेठेत शुकशुकाट
Featured

कोरोना : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Dhananjay Shinde

थिएटर, नाट्यगृह, अंगणवाड्या, जलतरण तलाव, जीमही बंद राहणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी रविवारी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जमू नये, यासाठी उपाययोजना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार, जिल्ह्याच्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या, सर्व शॉपिंग मॉलमधील दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा, दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून), चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि नाट्यगृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेणण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.

याशिवाय, जिल्हयात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांसाठीही परवानगी दिली जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडया साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार दिनांक 31 मार्चपर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हयामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होई पावेतो परवानगी देण्यात येवू नये. तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्याच्या सूचना साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी सुट्टीवर, शिक्षक शाळेवर.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली असली तरी सदरची सुट्टी फक्त विद्यार्थ्यांना आहे. शिक्षक, प्राध्यापकांनी मात्र 31 मार्चपर्यंत दररोज शाळेत उपस्थित राहून परीक्षेशी संबंधित व इतर शालेय कामे पार पाडावयाची आहेत. यात पुढील वर्षाचे शैक्षणिक कामे, मूल्यमापन तसेच पेपर तपासणी आदीसारखी कामे करावी लागणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com