Friday, April 26, 2024
Homeनगरअपहार प्रकरण : मजले चिंचोलीचे उपसरपंच, ग्रामसेवकाच्या अटकेस टाळाटाळ

अपहार प्रकरण : मजले चिंचोलीचे उपसरपंच, ग्रामसेवकाच्या अटकेस टाळाटाळ

अहमदनगर (प्रतिनिधी ) – तालुक्यातील मजले चिंचोलीच्या ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवकावर सरपंचाच्या बोगस सह्याकरून 57 लाखाचा अपहार व जलयुक्त योजनेच्या निधीमध्येही अपहार केला असताना आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल असतानाही आरोपी अद्याप मोकळे आहेत. जाणीवपूर्वक अटक करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा असल्याने यास वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

महिला सरपंचाच्या बोगस सह्या करुन सुमारे 57 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्‍हाट विरोधात 25 जानेवारीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात सरपंच गीतांजली आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 1 जानेवारी 2016 ते 1 डिसेंबर 2018 या कालावधीत मजले चिंचोली ग्रामपंचायतचे उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्‍हाट यांनी संगनमताने जेऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने संयुक्त खाते उघडून त्याचा हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल 17 लाख 69 हजार 456 रुपयांचा अपहार केला. तसेच पाणीपट्टी वसुलीचे बेकायदेशीर खाते उघडून त्यातूनही 1 लाख 58 हजार 530 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली.

- Advertisement -

याप्रकरणीही 4 फेब्रुवारीला नगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम मुरलीधर तुपे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आव्हाड व जर्‍हाट विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दहा दिवसांच्या अंतराने दोन गुन्हे दाखल होवून देखील पोलिस आव्हाड व जर्‍हाट यांना अटक करत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आव्हाड व जर्‍हाट यांनी केलेल्या आर्थिक ग़ैरव्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून तत्कालीन सरपंच गीतांजली आव्हाड याबाबत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी पाठपुरावा करत होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदन देवूनही दखल घेतली गेली नाही. एमआयडीसी पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर आव्हाड यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितल्यानंतर जिल्हा न्यायाधीश शबनम शेख यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे एमआयडीसी पोलिस आरोपींना अटक करण्यात टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या