वाळूतस्करांनी केला मंडलाधिकार्‍यांच्या अपहरणाचा प्रयत्न
Featured

वाळूतस्करांनी केला मंडलाधिकार्‍यांच्या अपहरणाचा प्रयत्न

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – पकडलेला वाळूचा ट्रक जामखेड तहसील कार्यालयात जप्त करण्यासाठी नेत असताना वाळू तस्करांनी ट्रकसह मंडल अधिकार्‍याचेच अपहरण केले. यानंतर मंडल अधिकारी व तहसीलदारांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच महसूल विभागाने कारवाई साठी वापरलेल्या खाजगी वहानावर हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. दुसर्‍या दिवशी संतप्त झालेल्या महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. याप्रकरणी आरोपी सुनील किसन आजबे, रा. जमदारवाडी ता. जामखेड व पोपट दिलीप हळनावर. रा. जांबवाडी रोड जामखेड यांच्यासह इतर दोन अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती अशी की, जामखेड महसूल विभागाच्या पथकातील तहसीलदार विशाल नाईकवाडे, मंडल अधिकारी सुखदेव कारंडे, तलाठी शिवाजी हजारे या चार जणांचे पथक जामखेड अरणगाव रोडवर गस्त घालत होते. याच दरम्यान अरणगाव ते खडकत रोडवर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा वाळूचा हायवा ट्रक क्रमांक एम एच 16 सी. सी 5769 हा जामखेडकडे येत होता. यावेळी या पथकाने हा ट्रक आडवून ताब्यात घेतला व जप्त करुन आरोपी सुनील किसन आजबे याच्या सह हा ट्रक तहसील कार्यालयात घेऊन येत आसताना ट्रक मालक आरोपी पोपट दिलीप हळणावर हा चार चाकी बोलेरो गाडीने पाठीमागून येऊन आपली बोलेरो गाडी ट्रक ला आडवी लावली. यानंतर फिर्यादीस ट्रक सोडून देण्यास सांगितले.

मात्र फिर्यादीने ट्रक सोडण्यास नकार दिला. यावेळी ट्रक मालक व चालक यांनी ट्रक तहसीलमध्ये न नेता तो मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे यांच्यासह ट्रक पळवून नेला. यावेळी चालक, मालकाने ट्रकमधील वाळू रस्त्यातच खाली केली. यानंतर हा ट्रक मंडल अधिकारी गव्हाणे यांना घेऊन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव रोडवरील हद्दीत नेण्यात आला. या घटनेची माहिती जामखेडचे पथक प्रमुख तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तातडीने जामखेड व आष्टी पोलिसांना दिली. पळवलेल्या ट्रकचा जामखेड पोेलिसांनी पाठलाग करुन आष्टी (जि. बीड) तालुक्यातील हद्दीत हा ट्रक पकडला व ट्रकमधून मंडल अधिकारी गव्हाणे यांची सुटका केली. जामखेड पोलिसांनी ट्रक शुक्रवारी पहाटे जप्त करुन पोलीस ठाण्यात आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक पोपट दिलीप हळनावर यास ताब्यात घेतले आहे तर इतर तीन आरोपी फरार आहेत.

दरम्यान शुक्रवार दि 6 रोजी पहाटे वाळु तस्करांविरोधात कारवाई करण्यासाठी वापरण्यात आलेली चार चाकी खाजगी वहान हे तलाठी शिवाजी हजारे यांनी ते रहात आसलेल्या आपल्या जामखेड खर्डा रोडवरील बोराटे वस्ती या ठिकाणी लावण्यात आले होते. याच वाहनावर इतर आरोपींनी वाळु च्या ट्रकवर कारवाई चा राग मनात धरून या चारचाकी वहाणाची मोडतोड करून गाडीच्या काचा फोडल्या व घटनास्थळाहुन फरार झाले. दरम्यान वाळू तस्कारांच्या दहशतीने जामखेड शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेप्रकरणी वरील चार आरोपीं विरोधात सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे करत आहेत.

कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
सदर घटनेचा महसूल कर्मचार्‍यांनी निषेध केला आहे. तहसीलदार, कर्जत उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून दिवसभर काम बंद आंदोलन केले. या निवेदनावर कामगार तलाठी सुखदेव कारंडे, विकास मोराळे, एस.के.खिळे, एस. आर. शेख, ए. पी. जोशी, जी. जे.नागोरे, आर. जे. गावित, एस. एस. हजारे यांच्यासह 32 कर्मचार्‍यांच्या सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com