मुख्यमंत्र्यांकडून ‘पाथरी’चा उल्लेख : शिर्डीकरांमध्ये नाराजी
Featured

मुख्यमंत्र्यांकडून ‘पाथरी’चा उल्लेख : शिर्डीकरांमध्ये नाराजी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

शिर्डी (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पाथरी गावाचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा केल्याने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांची बैठक घ्यावी व यापुढे साईबाबा जन्मस्थळाच्या उल्लेखावरून वाद होणार नाही याबाबत सरकार पातळीवर काळजी घ्यावी, अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याने पाथरीला तिर्थक्षेत्र विकासातून मदत करणार असल्याची घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना उमटली आहे.

या पाश्वभमीवर शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष साईसंस्थानचे माजी विश्वस्त कैलासबापू कोते यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. ते म्हणाले, साईबाबांनी आपल्या हयातीत आपल्या पंथाचा अथवा जन्मस्थळाचा कोठेही उल्लेख केला नाही. आयुष्यभर शिर्डीतील एका पडक्या मशिदीत राहुन भक्तांची सेवा केली. जगाला सर्व धर्म समभावाची शिकवण दिली त्याचबरोबर श्रध्दा आणी सबुरी हा मंत्र दिला. साईबाबांच्या या शिकवणीचा प्रभाव पडल्याने आज देश-विदेशातील करोडो साईभक्तांचे श्रध्दास्थान अशी ओळख शिर्डीची झाली आहे. आज साईबाबांच्या शिर्डीत देश विदेशातील करोडो साईभक्त दरवर्षी येतात आणि साईंच्या चरणी लीन होतात.

साईबाबांच्या जीवनकार्याबद्दल संपुर्ण अधिकृत माहीती ही साईसतचरित्रातच असून तरीही काही ठिकाणचे लोक जाणीवपुर्वक साईबाबांच्या जन्मस्थळाची चुकीची माहिती देवून साईभक्त व सरकारची दिशाभुल करीत आहेत. यापुर्वी देखील राष्ट्रपती शिर्डीत आले असता त्यांच्याही भाषणातून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख झाल्याने शिर्डी ग्रामस्थ आणी देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ माजली होती. सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी राष्ट्पतींंची थेट राष्ट्रपती भवनात जावून भेट घेतली आणि साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत असलेला त्याचा गैरसमज दूर केला. त्यानंतर हा वाद संपुष्टात आला होता.

मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौर्‍यावर असताना काही लोकांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देवून पाथरी येथील विकासाला मदत देण्याची मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख केल्यावर देश विदेशातील करोडो साईभक्तांच्या भावना दुरावस्था गेल्या असुन शिर्डी ग्रामस्थांमध्येही नाराजीची भावना उफाळून आली आहे. पाथरीच्या विकासाला निधी देण्याबाबत साईभक्त अथवा शिर्डी ग्रामस्थांचा कोणताही आक्षेप नाही. फक्त साईबाबांचे जन्मस्थळ या उल्लेखाला शिर्डीकर आणी करोडो साईभक्तांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लवकरच शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थ भेटून याबाबतची खरी वस्तुस्थिति सांगणार आहे . साईबाबा आणी शिर्डी हा विषय देश विदेशातील करोडो लोकांच्या श्रध्देचे ठिकाण असल्याने साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत चुकीची माहीती साईभक्तांपुढे जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहीजे, असेही केलासबापू कोते यांनी सांगीतले.

Deshdoot
www.deshdoot.com