साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळात मातंग समाजाला संधी मिळावी
Featured

साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळात मातंग समाजाला संधी मिळावी

Sarvmat Digital

जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी) – आगामी काही दिवसांत नियुक्त होत असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळात मातंग समाजाला विश्‍वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रामभाऊ पिंगळे, लहुजी सेनेचे शिर्डी शहराध्यक्ष समीर वीर यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाज हा कायमच काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहिला आहे. शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा या राखीव मतदारसंघातून मातंग समाजाला उमेदवारी मिळावी ही मागणी करुनही पक्षाने दुर्लक्ष केले. तरीही मातंग समाजाने नाराज न होता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिला. आजपर्यंत आम्ही साईबाबांच्या शिकवणुकीप्रमाणे श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्राचे आचरण करुन हा समाज काँग्रेस पक्षाबरोबर प्रामाणिकच राहिला आहे. अशा या मातंग समाजाच्या प्रतिनिधींना साईबाबा संस्थानच्या नव्याने नियुक्त होणार्‍या विश्‍वस्त मंडळात संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य सरकारने मागासवर्गीय महामंडळाची कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आ. बाळासाहेब थोरात यांचा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती व लहुजी सेना यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

गेली अनेक वर्षापासून रामभाऊ पिंगळे व मंजाबापू साळवे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे काम प्रामाणिक करीत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळात अनेकांनी पक्षांतर केले मात्र पिंगळे व साळवे यांनी काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहून काम केले. जिल्ह्यात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने संघटन करुन पक्षाला बळ दिले म्हणून भविष्यात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाला भरीव ताकद देण्याचे काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या नात्याने करणार असल्याचे ना. थोरात यांनी स्पष्ट केले.

यावेळी योगेश पगारे, प्रवीण पवार, नवनाथ पगारे, आकाश भडकवाल, आकाश रजपूत, अंबादास पगारे, जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे मंजाबापू साळवे, राहुल जाधव, अशोक साळवे, गणेश आव्हाड, विनायक पवार, सचिन आल्हाट, रावसाहेब जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com