साई संस्थान शिवसेनेकडे ठेऊन अध्यक्षपदी स्थानिकाची नेमणूक करावी

साई संस्थान शिवसेनेकडे ठेऊन अध्यक्षपदी स्थानिकाची नेमणूक करावी

शिर्डी (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे नवीन सरकार नुकतेच स्थापन झाले असून या सरकारकडून शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांची लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा केली जात आहे. या संस्थानवर अध्यक्ष म्हणून स्थानिक प्रतिनिधीची नेमणूक करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुुकुंद सिनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून आलेला नाही. आमच्याकडे जनतेची कामे करण्यासाठी एकही मोठे माध्यम नाही. एकीकडे मुंबई मधील सर्वच सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात असताना मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यासारख्या प्रगत जिल्ह्यात पक्षाचे प्रभुत्व टिकविण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कुठलेही मोठे साधन नाही. यात फक्त श्री साईबाबा संस्थानच एक सर्वोत्तम देवस्थान आहे.

जिथे संपूर्ण जगभरातून अनेक साईभक्त शिर्डीला येतात. शिर्डीतील श्री साईबाबा देवस्थान व पंचक्रोशीतील भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यानिमित्ताने श्री साईबाबांची सेवा करण्याची संधी आपल्या पक्षाला मिळालेली आहे. श्री साईबाबा संस्थानची व्याप्ती अत्यंत मोठी असून या माध्यमातून आपण अनेक लोकाभिमुख उपक्रम राबऊ शकतो. आम्ही श्री साईबाबांचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रामाणिक काम करत असताना आम्हा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी दुसरी कुठलीही उपलब्धी नाही. म्हणून श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था हे देवस्थान आपल्या पक्षाकडे असावे. आपण विश्वस्त व्यवस्थेत कुणालाही संधी द्या परंतु येत्या पाच वर्षात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसैनिकांच्या विजयासाठी साईबाबा संस्थान अध्यक्षांसह पक्षाकडे असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर कक्ष उपजिल्हाप्रमुख सुधाकर वादे, कोपरगाव कक्ष तालुकाप्रमुख अशोक पवार, राहाता कक्ष तालुकाप्रमुख मिनिनाथ शिंदे, शिर्डी कक्ष शहरप्रमुख रवि सोनवणे, राहुरी कक्ष तालुकाप्रमुख गंगाधर सांगळे, नेवासा कक्ष तालुकाप्रमुख जयराम कदम, श्रीरामपूर कक्ष तालुकाप्रमुख श्रीकांत शेळके, अकोले कक्ष तालुकाप्रमुख अतुल लोहाटे आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com