साई पादुका चांदीचे नाणे पुन्हा सुरु करावे; साईभक्तांची मागणी
Featured

साई पादुका चांदीचे नाणे पुन्हा सुरु करावे; साईभक्तांची मागणी

Sarvmat Digital

शिर्डी (शहर प्रतिनिधी )- साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने साईबाबांची आठवण राहावी म्हणून 25 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देणार्‍या भाविकास 20 ग्राम वजनाच्या साईपादुका असलेले चांदीचे नाणे देण्याचा शुभारंभ मागील वर्षी करण्यात आला होता. मात्र कालांतराने अल्पावधीतच या योजनेला तांत्रिक कारणाने ब्रेक लागल्याने 25 हजार रुपये देणगी देणार्‍या भाविकांनी याबाबत सवाल उपस्थित केला असून चांदीचे नाणे पुन्हा सुरू करावे, अशी मागणी सर्वसामान्य साईभक्तांनी केली आहे.

साईबाबा संस्थानला मोठ्या प्रमाणात भाविकांकडून दान स्वरूपात चांदी प्राप्त होत असून आजमितीला पाच हजार किलो चांदी पडून आहे. त्यामध्ये अजून दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चांदीचा उपयोग सत्कारणी लागावा तसेच भक्तांकडे साईबाबांची आठवण राहावी म्हणून 20 ग्रॅम साई पादुका असलेले चांदीचे नाणे बनवून ते 25 हजार किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देणार्‍या भाविकांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाने घेतला होता. मात्र चांदीसह हे नाणे 1800 रुपये किमतीला पडत होते. यामध्ये ना नफा ना तोटा या बेसवर खरेदी करण्यात आले होते.

मागील गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचा शुभ मुहूर्त शोधून तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते 20 ग्राम साईपादुका असलेले चांदीचे नाणे मिळविण्याचा पहिला मान केनिया येथील सलीम फातिमा फराह यांनी पटकावला होता. थोडे दिवस सदरील चांदीचे नाणे भाविकांना वाटप करण्यात आले. त्यानंतर मात्र नाणे देण्याचा निर्णय बंद केल्याने अनेक भाविकांनी संस्थांनच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. संस्थानने सदर चांदीचे नाणे भक्तांना देण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात यावी अशी माफक अपेक्षा साईभक्तांनी व्यक्त केली असून बाबांची आठवण घरोघरी पोहोचेल तसेच संस्थानकडे असलेल्या चांदीचा उपयोग होऊन भाविकांना मनस्वी आनंद मिळेल, असे मत साईभक्तांनी व्यक्त केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com