Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसैराट फेम ‘परश्या’ च्या नावाने नगरच्या महिलेला दीड लाखांना गंडा ; माजी...

सैराट फेम ‘परश्या’ च्या नावाने नगरच्या महिलेला दीड लाखांना गंडा ; माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

सार्वमत

पुणे – सैराट चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर (परश्या) याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून नगरच्या महिलेची सुमारे दीड लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत घडली. याप्रकरणी अहमदनगर सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय 25, रा. मोहननगर, चिंचवड स्टेशन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चव्हाण हा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका दिवंगत माजी नगरसेवकाचा मुलगा आहे.

- Advertisement -

आरोपी शिवदर्शन चव्हाण याने अभिनेता आकाश ठोसर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यानंतर अहमदनगर येथील एका महिलेसोबत फेसबुकद्वारे मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संबंधित महिलेकडून सोन्याचे एकाच मंगळसूत्र व हातातील अंगठी असे जवळपास 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने परत करण्याच्या बोलीवर घेतले. हा आरोपी संबंधित महिलेकडून दागिने घेण्यासाठी नगरला आला होता. तेव्हा त्याने मला आकाश ठोसर याने पाठवले असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र दागिने परत न केल्याने संबंधित महिलेला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत अहमदनगर सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता महिलेची फसवणूक करणारा संबंधित आरोपी हा पिंपरी चिंचवड (पुणे) येथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पथकाने चिंचवड येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून संबंधित महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या