रोजगार हमीचा 1 हजार 585 कोटींचा आराखडा !

रोजगार हमीचा 1 हजार 585 कोटींचा आराखडा !

2020-21 वर्ष : 1 लाख 40 हजार कामांना मान्यता : 4 कोटी 57 मनुष्यदिनांची निर्मिती

अहमदनगर – जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढील आर्थिक वर्षातील 2020-21 साठीचा ग्रामपंचायत आणि यंत्रणेचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात सेल्फवर 1 हजार 585 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली असून यातून 1 लाख 40 हजार कामे उभी राहणार आहेत. आराखड्यात 4 कोटी 57 लाख 95 हजार मनुष्यदिनाची निर्मिती होणार आहे.

यंदाच्या आरखड्यात अ, ब, क, कॅटेगरीनुसार यंदापासून नव्याने ‘ड’तयार करून त्यानुसार रोजगार हमी योजनेतून कामे करता येणार आहेत. या ‘ड’ कॅटेगिरीत आता खेळाचे मैदान, आरसीसी मुख्य निचरा प्रणाली, रस्ता, सिमेंट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, डांबरी रस्ता, शाळेसाठी कुंपन, चक्रीवादळ निवारा, ग्रामपंचायत राजीव गांधी भवन, अंगणवाडी, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह निवारा आणि स्माशानभूमी शेड बांधकाम करण्यात येणार आहे.

या कॅटेगिरीतील 13 हजार 710 कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यंदापासून अभिसरण म्हणून संबोधित असणार्‍या कामांना त्यामुळे विभागाकडून अतिरिक्त निधी आणि नरेगातून अकुशल वर्गवारीतून निधी देण्यात येणार आहे. यामुळे खर्‍याअर्थाने रोजगार हमीची व्याप्ती वाढणार आहे. रोजगार हमी योजना ही जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना अशा दोन स्वतंत्र विभागातून राबविली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजुरी देण्यात येणार्‍या कामांना यंत्रणेकडील तर जिल्हा परिषदेकडील कामांना ग्रामपंचायतींकडील कामे असे संबोधण्यात येते.

पुढील आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाने आराखडा तयार केला असून यात सिमेंट बंधार्‍यांची 505, भूमिगत बंधार्‍यांची 506, गॉबियन बंधारे 898, विहीर पुनर्भरण 6 हजार 347, शोषखड्डे 20 हजार 315, नाला बांध 1 हजार 360, सलग समतल चर 10 हजार 659, पाझर तलाव दुरूस्ती 148, नालाखोलीकरण व रुंदीकरण 126, गाळ काढणे 787, वनीकरण व गट लागवड 920, शेतबांध बंदिस्त 9 हजार 467, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड 1 हजार 145, रोपवाटीका 346, सिंचन विहीर 5 हजार 523, शेततळे आणि सामुदायिक शेततळे 6 हजार 513, फळबाग लागवड 12 हजार 357, रेशम उत्पादन 501, विखुरलेली वृक्ष लागवड 2 हजार 479, घरकुल 9 हजार 50, गुरांचा गोठा 10 हजार 786, शेळीपालन शेड 3 हजार 919, कुक्कुटपालन शेड 1 हजार 724, बचत गटाच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे 177, मत्स्यपालन 53, नाडेप कंपोस्ट 11 हजार 451, व्हर्मी कंपोस्ट 8 हजार 470, अझोला उत्पादन 332, सार्वजनिक जागेवरील गोदाम 10, शौचालय 8 हजार 407 आदींचा समावेश असून या कामांची संख्या 1 लाख 40 हजार आहे.

यासाठी 989 कोटी 43 लाख 28 हजार रुपयांच्या अकुशल तर 596 कोटी 3 लाख 37 हजार कुशल अशा 1 हजार 585 कोटी 46 लाख रुपयांच्या कामांना या आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्याला मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आलेली आहे.

साडेचार कोटी लोकांना मिळणार रोजगार
‘रोहयो’ विभागाच्या नियोजनानुसार पुढील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 4 कोटी 57 हजार लोकांना रोहयोतून कामे मिळू शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 4 कोटी 57 लाख मनुष्यदिनांची निर्मिती करण्यात आली आहे. एका मजुराला एका दिवसाला मिळणारे काम म्हणजे एक मनुष्यदिन असल्याचे रोहयो विभागाकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com