महसूलने थकविले जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन
Featured

महसूलने थकविले जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन

Sarvmat Digital

लोकसभा-विधानसभा निवडणूक काळातील नियुक्त कर्मचार्‍यांचे मानधन देण्यास टाळाटाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुका असोत की अन्य शासकीय परीक्षा किंवा अन्य कामे, दरवेळी महसूलकडून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महसूल प्रशासनाने नियुक्त केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा केलेले नाही. विशेष म्हणजे याच महसूल विभाागने त्यांच्या कर्मचार्‍यांचे मानधन मात्र अदा केले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महसूल यंत्रणे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमधून 5 ते 7 कर्मचार्‍यांची सुमारे महिनाभरासाठी नियुक्त केली होती. या काळात संबंधित कर्मचार्‍यांना निवडणूक कामासाठी निवडणूक विभागाने निर्माण केलेल्या एक खिडकी योजनेत नियुक्ती केली. या ठिकाणी नियुक्त जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी काम केले. निवडणूक आयोगाने यासाठी महसूल विभागाकडे मानधन जमा केलेले आहे. मात्र, जाणीवपूर्वक महसूल विभागाने जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा केलेले नाही.

हा प्रकार जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बाबतीत पहिल्यांदा घडलेला नाही. महसूल विभागाकडून घेण्यात येणार्‍या विविध शासकीय परीक्षा आणि उपक्रमात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला वापरून त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमधून करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा निवडणूक शाखेची संपर्क साधला असता जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा करण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी या कर्मचार्‍यांची नियुक्त ही संबंधित तालुक्यााचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी केलेली आहे. त्यांच्याकडे सर्वांचे मानधन वर्ग करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

महसूल विभागाने तातडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात नियुक्त केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा करावे. यापूर्वी असा प्रकार घडलेला आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना महसूल विभागाने कमी लेखू नयेत, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचाा मोबदला मागण्यात गैर काहीच नाही.
-विजय कोरडे, जिल्हा परिषद कर्मचारी नेते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com