Featured

…तरच देशाची प्रतिष्ठा सुरक्षित राहील !

Balvant Gaikwad

हिंदू-मुस्लीम समाजात मधूर संबंध टिकवून ठेवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी परिश्रम घेतले. सरदार पटेलांवर मुस्लीमविरोधी असल्याचे आरोप होत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सरदारांच्या मनाचा मोठेपणा पटवून दिला होता. हे सर्व आठवण्याचा आणि आठवणीत ठेवण्याचा अर्थ एवढाच की सांप्रदायिकतेच्या विषापासून दूर राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच करावा. दिल्लीत जे घडले तो इशारा लक्षात घ्यावा. देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणूनच मानावे. तसे झाले तरच देश व आपण सुरक्षित राहू !

विश्वनाथ सचदेव –

(लेखकज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)

दिल्लीतील काही भागात सांप्रदायिकतेच्या ठिणग्या उठत होत्या. योगायोगाने ‘सरदार पटेल तथा भारतीय मुसलमान’ हे पुस्तक माझ्या हाती पडले. स्व. डॉ. रफिक झकेरिया यांनी सुमारे तीन दशकांपूर्वी हे इंग्रजी पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाची प्रत व लोकार्पण समारंभाचे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी मला पाठवले होते. त्यावेळीही मी ते पुस्तक वाचले होते.

या पुस्तकाचा सर्व भाषांमध्ये अनुवाद व्हावा, असे मी त्यावेळी सुचवले होते. पुस्तकाचे प्रकाशक आणि भारतीय विद्या भवनचे संचालक स्वर्गीय एस. रामकृष्णन यांनी माझ्या म्हणण्याचे समर्थन केले व पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे आश्वासन दिले होते. त्या अनुवादीत पुस्तकाची ही चौथी आवृत्ती मला ताज्या दंगलीदरम्यान मिळाली. म्हणून पुस्तक मी पुन्हा वाचले. फाळणीवेळी हिंदू-मुस्लिमांच्या एकतेची महत्ता देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी किती गांभीर्याने जाणली होती. दोन्ही समाजांत मधूर संबंध टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी काय-काय केले? फाळणीदरम्यान आणि नंतरही सरदार पटेलांवर बहुसंख्य हिंदूंची बाजू घेतल्याचे आरोप सतत होत होते. सरदार पटेल यांना हिंदूंचा समर्थक व मुस्लिमांचा विरोधक म्हणणार्‍यांना डॉ. झकेरिया यांनी त्यांच्या पुस्तकात सडेतोड उत्तर दिले. अतिशय दृढतेने आणि स्पष्ट शब्दांत सर्व तथ्ये समोर ठेवली.

सरदारांना मुस्लीमविरोधी म्हणणे म्हणजे सत्याची थट्टा करणे होय. सरदार पटेलांवर मुस्लीमविरोधी असण्याचे आरोप होत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सरदारांच्या मनाचा मोठेपणा पटवून दिला होता. ‘सरदारांचे मन इतके मोठे आहे की त्यात सारे सामावू शकतात’ असे गांधीजी म्हणाले होते. हिंदू-मुस्लीम एकता ही एखाद्या कोवळ्या रोपासारखी आहे. त्या रोपट्याची दीर्घकाळ काळजीपूर्वक जोपासना करावी लागेल. कारण आमची मने हवी तितकी निर्मळ नाहीत, असे सरदार पटेल म्हणत होते. पुस्तकातील हे शब्द वाचताना मी जागीच खिळलो. दिल्लीच्या काही भागात अलीकडे जे काही घडले ते सारे डोळ्यांसमोर तरळले.

स्वातंत्र्य मिळवून 73 वर्षे उलटूनसुद्धा आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राची शपथ घेऊनही आपली मने पाहिजे तेवढी निर्मळ का होऊ शकली नाहीत? असेच जणू मी स्वत:लाच विचारत होतो. आम्ही वेळोवेळी सांप्रदायिकतेचे शिकार का होतो? एकतेच्या कोवळ्या रोपाचे प्रेमाने व काळजीने जतन आम्ही का करू शकत नाही? फक्त झेंड्यांचेच रंग का लक्षात राहतात? सर्वांच्या रक्ताचा रंग एकच आहे हे आपण का विसरतो? परस्परांतील आपलेपणाच्या भावनेमुळेच राजधानी दिल्लीत द्वेषाची आग अधिक पसरू शकली नाही, पण 50 हून अधिक लोकांचा बळी जाणे, तीनशे जण जखमी होणे आणि शेकडो दुकाने-घरे भस्मसात होणे ही लहानशी गोष्ट नाही. सांप्रदायिक दंगलीत एखादा भारतीय मृत्युमुखी पडणे हा भारताच्या गंगा-जमुनी सभ्यता आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ संस्कृतीच्या विचाराची हत्या करण्याचा लज्जापद प्रयत्न आहे.

देशातील प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांनी सरदार पटेलांवरील डॉ. झकेरिया यांच्या पुस्तकातील भूमिकेला अनुरूप विचार मांडला आहे. सत्तेच्या संघर्षात प्रादेशिकता, धर्म, जात आदींच्या नावावर राजकारणाचा धोकेदायक खेळ करणार्‍यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या खेळामुळे भलेही अल्पकालिक लाभ मिळू शकेल, पण पुढे देशाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पालखीवाला यांनी दिला आहे. खरे तर बालिशपणामुळे ही किंमत देशाला सतत मोजावी लागत आहे. नेते कोणतेही दावे करत असले तरी राजकारणाच्या नावावर देशात सध्या जे काही चालू आहे ते देशहिताचे नाही. धर्म आणि जातीच्या नावावर मतपेढ्या बनवण्याची मानसिकता उचित नाही. दिल्लीत जे घडले तो याच गढूळलेल्या मानसिकतेचा भयावह परिणाम आहे. आतापर्यंत घडलेल्या जातीय दंगलींपासून आम्ही काहीच धडा घेतलेला नाही हे त्यावरून स्पष्ट होते व ते भयानक आहे. काही शिकण्याची आमची तयारीही नाही का? उपद्रवांची सुरुवात कोणी केली? लोकांना कोणी भडकावले? पोलिसांच्या भूमिकेचे औचित्य कसे सिद्ध होणार? दंगलींच्या निखार्‍यावर राजकीय स्वार्थाच्या भाकरी कोण भाजत आहेत? यांसारखे प्रश्न विचारले जात आहेत. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची स्पर्धा सुरूच आहे. अशी स्पर्धा व्यक्तिगत अथवा पक्षीय स्वार्थ साधण्यात भलेही उपयोगी ठरत असेल, पण त्यामुळे देशाचा तोटाच होईल. अशा नुकसानीची भरपाई अशक्य आहे.

सांप्रदायिकतेच्या राजकारणाला कोणताही अर्थ नसतो. हे विध्वंसाचे राजकारण आहे. याच राजकारणात हिंदू राष्ट्राची चर्चा नेहमीच केली जाते, हेही दुर्लक्षिता येणार नाही. भारतीय संविधान निर्मात्यांनी – यात सरदार पटेल यांचीही विशेष भूमिका होती – खूप विचारपूर्वक सर्वधर्मसमभावाचे धोरण अवलंबले होते. जिन्ना यांनी भलेही धर्माच्या नावावर फाळणी करवली असेल, पण भारत हे हिंदू राष्ट्र बनावे, असे भारतीय नेत्यांनी कधीही मान्य केले नाही. या राष्ट्रात सर्व धर्मांची फुले उमलतील व जो प्रत्येक भारतीयाचा देश असेल अशा सर्वसमावेशक राष्ट्राचे स्वप्न सर्वांनी पाहिले होते.

सरदार पटेल यांना हिंदूंचे हितचिंतक म्हणून सांगण्याचे प्रयत्न आजही चढाओढीने सुरू आहेत, पण सरदार पटेल हे सर्वांचेच हितचिंतक होते. भारतात हिंदू राज्याविषयी बोलणे हा वेडेपणा आहे. त्यामुळे भारताचा आत्मा मृत्यू पावेल, असे सरदार म्हणत! भारतीय जनतेने या वेडेपणापासून स्वत:ला वाचवावे म्हणूनही त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. सरदार पटेल यांना सर्वाधिक चिंता राष्ट्रीय एकतेची होती, हेही विसरता येणार नाही. जिना यांच्या उपदेशांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ‘पहिली समस्या’ असे म्हटले होते. ‘भारतीय मुस्लीम सुरक्षित आणि स्वतंत्र राहावेत हे पाहणे आपले काम आहे’, असेही ते म्हणत. प्रश्न फक्त मुस्लिमांच्या स्वातंत्र्याचा व सुरक्षेचा नव्हता तर प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेचा होता. आजसुद्धा हा प्रश्न कायम असून यापुढेही तो राहील. भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाचे स्वातंत्र्य आणि सुरक्षेची हमी देते, पण प्रत्येक भारतीय दुसर्‍या भारतीयाची सुरक्षा, स्वातंत्र्य, प्रगतीबद्दल चिंता करील तेव्हाच ती हमी अर्थपूर्ण ठरेल. भारतातील रहिवाशांनी स्वत:ला प्रथम भारतीय समजले पाहिजे. इतर गोष्टी त्यानंतर! संविधान सभेत याविषयी सरदार पटेल यांनी मांडलेली भूमिका सर्वांना मार्गदर्शक आहे.

डॉ. झकेरिया यांच्या पुस्तकात याबद्दल सविस्तर चर्चा आहे. बहुसंख्याकांची समजदारी आणि निष्कपटतेवर विश्वास ठेवणे हीच अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी असू शकते, असे सरदार पटेल म्हणत. अल्पसंख्याकांची भावना समजून घेण्याची जबाबदारी आम्हा बहुसंख्याकांवर आहे. त्यांच्यासोबत जे काही होत आहे तसे वर्तन आपल्यासोबत झाले तर कसे वाटेल याची कल्पनाही प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे. संविधानाच्या कलम 25 मध्ये धर्माच्या ‘प्रसारा’चा मुद्दा जोडण्यासाठी सरदार पटेल यांनी आपली प्रतिष्ठा आणि प्रभाव पणास लावला होता. हे सर्व आठवण्याचा आणि आठवणीत ठेवण्याचा अर्थ एवढाच की सांप्रदायिकतेच्या विषापासून दूर राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच करावा. दिल्लीत जे घडले तो इशारा लक्षात घ्यावा. देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणूनच मानावे. तसे झाले तरच देशाची मान उंचावेल आणि देश व आपण सुरक्षित राहू!

Deshdoot
www.deshdoot.com