बलात्काराच्या आरोपीचे श्रीरामपुरातून पलायन
Featured

बलात्काराच्या आरोपीचे श्रीरामपुरातून पलायन

Sarvmat Digital

पोलिसांची धावपळ ; काही तासांत पुन्हा ताब्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून बेडीसह धूम ठोकली. त्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. मात्र सायंकाळी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला गोंधवणी शिवारात शिताफीने पकडले.

राहुल गणेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे. काल मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तो ग्रामीण रुग्णालयातून बेड्यांसह पसार झाला. यावेळी तिघा पोलीस कर्मचार्‍यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला.

यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक त्याठिकाणी दाखल झाली. शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे. त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता आरोपी पळाल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला होता.

दरम्यान आरोपी पळून गेल्यानंतर श्रीरामपूर पोलिसांनी तपास मोहीम राबवून गोंधवणी शिवारात आरोपीला जेरबंद केले असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com