कारखाना निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही – राजेंद्र नागवडे
Featured

कारखाना निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही – राजेंद्र नागवडे

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – नागवडे सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नव्या वर्षांत होत आहे. वैयक्तिक व सोसायटी सभासद मतदान पात्रतेस नवीन सहकार कायद्यानुसार निरनिराळ्या अटी आहेत. त्यांचा अवलंब केल्यास अनेक सभासद मतदानापासून वंचित राहू शकतात. मात्र याबाबत आम्ही दक्षता बाळगली असून नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत कोणताही वैयक्तिक व सोसायटी सभासद मतदानापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला.

शनिवारी सकाळी अकरा वाजता नागवडे कारखान्याच्या अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत नागवडे बोलत होते. यावेळी नागवडे म्हणाले, नागवडे कारखान्याच्या उभारणीपासून सभासदांनी सतत आमच्यावर विश्वास दाखवला आहे. सभासदांच्या विश्वासाला साजेसा कारभार संचालक मंडळ करीत आहे. सहकार विभागाने घालून दिलेल्या नियम व अटी लागू करून त्याअनुषंगाने आम्ही सहकार विभागाला प्राथमिक माहिती सादर केली. मात्र सुधारित सहकार कायद्यान्वये वैयक्तिक व सोसायटी मतदारसंघातील अनेक मतदार मतदानास अपात्र ठरत होते. मात्र, कारखाना प्रशासन सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार सहकार विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून सर्व सभासद मतदानास पात्र ठरविण्यासाठीची पूर्तता कारखान्याच्या पातळीवर केली जाणार आहे.

मतदार पात्रतेबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. या सर्व चर्चा निरर्थक असून नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्येक सभासदाला मतदानाचा हक्क असेल, अशी माहिती नागवडे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, श्रीनिवास घाटगे, अरुण पाचपुते, प्रा. सुनील माने, अ‍ॅड. सुनील भोस, विश्वनाथ गिरमकर, विलास काकडे, योगेश भोयटे, सचिन कदम, शरद खोमणे, अ‍ॅड. अशोक रोडे आदी उपस्थित होते.

अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी ठेवीची रक्कम भागांमध्ये वर्ग करण्याचे काम नागवडे कारखान्याने 2017 सालामध्येच केलेले आहे. नागवडे कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण झाला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com