Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरी पंचायत समितीत पुन्हा येणार ‘महिलाराज’

राहुरी पंचायत समितीत पुन्हा येणार ‘महिलाराज’

ओबीसी महिलासाठी सभापतिपदाचे आरक्षण जाहीर । सुनीताताई निमसे व बेबीताई सोडनर ‘सभापती’च्या दावेदार

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले असून सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे लाभार्थी इच्छुकांनी तातडीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी पंचायत समितीत पुन्हा महिलाराज येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, राहुरी पंचायत समितीवर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे वर्चस्व असून एकूण 10 पैकी तनपुरे गटाचे सहा तर विरोधी विखे गटाचे चार सदस्य आहेत. त्यामुळे सभापतिपद तनपुरे गटाकडेच जाणार असल्याचे अधोरेखित झाले असून माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडूनच सभापतींचे नाव ‘फायनल’ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तनपुरे गटाकडून बारागाव नांदूर गणातून ओबीसी राखीव गटातून निवडणूक लढविलेल्या बेबीताई सोडनर व टाकळीमिया गणातून माजी सभापती सुनीताताई निमसे या दोन सदस्याच सभापती पदासाठी दावेदार ठरण्याची चिन्हे असून यापैकी कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार? हे सर्वस्वी श्रेष्ठींवर अवलंबून राहणार आहे.

राहुरी पंचायत समितीवर केवळ तनपुरे गटाचेच वर्चस्व राहिलेले आहे. पंचायत समितीवर पूर्वाश्रमीचा काँग्रेसप्रणीत विखे गट आणि तनपुरे गटातच पंचायत समितीच्या निवडणुकीचा सामना रंगतो. सध्या विखे गट विरोधात असून तनपुरे गटाचे सध्या पंचायत समितीत बहुमत असल्याने तनपुरे गटाचाच सभापती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून प्राजक्त तनपुरे हे आमदारपदी विराजमान झाल्याने आता राहुरीची राजकीय समीकरणे बदलली आहेत. तालुक्यात तनपुरे गटाचा पुन्हा राजकीय वरचष्मा प्रस्थापित झाला आहे. विधानसभेपाठोपाठ पुन्हा राहुरी पंचायत समितीचे सभापतिपद तनपुरे गटाकडेच जाणार आहे.

राहुरी पंचायत समितीची निवडणूक दि. 21 मार्च 2017 रोजी झाली. सुमारे पाऊणेतीन वर्ष मनीषाताई ओहळ यांनी सभापतीपद भूषविले. राजकारणाचा काहीच वारसा नसताना त्यांनी राहुरी तालुक्याचे हे सर्वोच्च पद आपल्या कार्यकर्तृत्वाने भूषविले. अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.

आता बेबीताई सोडनर आणि सुनीताताई निमसे या दोन सदस्या या पदाच्या दावेदार आहेत. सुनीताताई निमसे या सन 1997 ते 2002 अशी पाच वर्ष सभापती होत्या. त्यांनी आपल्या सभापती पदाच्या कार्यकालात ग्रामीण विकासाला चालना दिली आहे. त्यांना सभापतिपदाचा चांगला अनुभव असून बेबीताई सोडनर यांनीही या पदासाठी दावा केला आहे. दरम्यान, आगामी सभापतिपदी निमसे की सोडनर? याबाबत राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या