एनआरसी व सीएबी या विधेयकाला विरोध करत राहुरीत मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा

एनआरसी व सीएबी या विधेयकाला विरोध करत राहुरीत मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा

राहुरी (प्रतिनिधी)- देशाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज सर्वात अगोदर आपले रक्त सांडण्यास तयार आहे. पूर्वीपासूनच मुस्लीम समाजाने भारत देशासाठी बलिदान दिले आहे. परंतु सध्याचे भाजपचे नेते मुस्लीम समाजाविरोधात विविध निर्णय घेऊन सत्तेचा दुरूपयोग करीत आहेत. मुस्लीम समाज नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात असून देशाला हिंसाचाराच्या खाईत लोटणार्‍या निर्णयाविरोधात आमचा आवाज दबणार नाही, असे राहुरी येथील समस्त मुस्लीम बांधवांनी म्हटले आहे.

देशात एनआरसी व सीएबी या विधेयकाला विरोध करण्यासाठी राहुरी तालुक्यातील मुस्लीम समाजाच्यावतीने महसूल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हातावर काळ्या पट्ट्या बांधून मुस्लीम समाजाने शांतपणे मोर्चा महसूल कार्यालयासमोर आणला. मोर्चकर्‍यांनी हुकूमशाही नही चलेगी, हिटलरशाही नही चलेगी असे लिहून हातामध्ये घेतलेल्या फलकाद्वारे नागरिक दुरूस्ती विधेकाला विरोध केला.

यावेळी मौलाना अस्लम म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मुस्लीम समाजाचे योगदान आहे. गंगा, जमुना तहजीब नुसार देशात सर्वधर्मिय एकत्र नांदत आहेत. संविधानाच्या संरक्षणासाठी मुस्लीम समाज सदैव पुढे राहील. परंतु समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी एनआरसी व सीएबी हे विधेयक आणले जात आहे. केवळ मुस्लीम समाजासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आम्ही मोर्चा काढल्याचेे मौलाना अस्लम यांनी सांगितले.

निसार सय्यद म्हणाले की, देशामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. देशामध्ये राहणार्‍या लोकांना आजही शासनाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या मुलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामध्ये बाहेरून येणार्‍या लोकांना नागरिकत्व देत शासन त्यांना काय देणार? असा प्रश्‍न सय्यद यांनी उपस्थित केला. उबेद बागवान यांनी सांगितले की, फाळणीवेळी भारत देशात राहणार्‍या मुस्लीम समाजाने मायभूमीलाच महत्त्व दिले.

जेव्हा वेळ आली तेव्हा मुस्लीम समाजातील अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मुस्लीम समाजाच्या देशप्रेमावर नेहमीच शंका उपस्थित करणार्‍या भाजप शासनाच्या निर्णयाविरोधात एकीने लढा देण्याची वेळ आल्याचे बागवान यांनी सांगितले. सूत्रसंचालन एमआयएमचे इम्रान देशमुख यांनी केले. प्रास्ताविक निसार सय्यद यांनी केले तर आभार इम्रान सय्यद यांनी मानले.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व महसूलचे दुर्गे यांनी निवेदन स्विकारत समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्‍वासन दिले.
यावेळी अय्युब पठाण, मुज्जु कादरी, सद्दाम पिरजादे, अमजद पठाण, कंकर जनाब, जाकीर शेख, रज्जू शेख, राजू शेख, युसूफ बागवान आदींसह मुस्लीम बांधव उपस्थित होते. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे चंद्रकांत जाधव, रासपचे नाना जुंधारे यांनी मोर्चाला पाठिंबा दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com