पगाराच्या आश्‍वासनानंतर ‘डॉ. तनपुरे’च्या कामगारांचे उपोषण समाप्त

पगाराच्या आश्‍वासनानंतर ‘डॉ. तनपुरे’च्या कामगारांचे उपोषण समाप्त

खासदार डॉ. सुजय विखे यांची मध्यस्थी; कामगारांनी मांडल्या व्यथा

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – कामगारांना एक नियमित पगार व एक ले-ऑफचा पगार आजच देऊन येत्या 20 जानेवारीपूर्वी आणखी एक नियमित पगार व दोन ले-ऑफचे पगार देण्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी जाहीर केल्याने डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे सुरू असलेले उपोषण काल गुरुवारी (दि. 19) तिसर्‍या दिवशी खा.डॉ.सुजय विखे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. कामगारांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

थकीत पगार, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युईटी मिळावी, या मागणीसाठी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी तसेच निवृत्त कामगारांनी कारखाना कार्यस्थळावरील श्रीछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. याबाबत अनेकांनी चर्चा करून देखील या कर्मचार्‍यांनी आपले उपोषण मागे घेतले नव्हते. मात्र, काल कारखान्याचे मार्गदर्शक खा. डॉ.सुजय विखे व अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी उपोषणाला बसलेल्या कर्मचार्‍यांशी चर्चा केली.

यावेळी राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मच्छिंद्र तांबे उपस्थित होते. प्रारंभी सुरेश थोरात, अर्जुन दुशिंग, चंद्रकांत कराळे, इंद्रभान पेरणे, भारत पेरणे, युनियन अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी कामगारांच्या व्यथा खासदार विखे यांच्यासमोर मांडून हे उपोषण विखे यांच्या विरोधात नसून आमच्या प्रपंचाची गरज म्हणून केले आहे, असे सांगून कामगारांनी आपल्या हाकेला नेहमीच साद दिली असल्याने आपण कामगारांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी केली.

खा. डॉ. विखे म्हणाले, खरंतर कामगारांवर उपोषणाची वेळ यावी, ही दुर्दैवी बाब आहे. हा कारखाना चालविण्यामध्ये कामगारांचा मोठा वाटा आहे. आमच्या काळामध्ये कामगारांची जे देणे शिल्लक आहे, ते देण्यास मी व्यक्तीगत जबाबदार आहे. त्यामध्ये थोडेफार मागेपुढे होऊ शकते. मात्र, कामगारांचा एक रुपयाही बुडणार नाही, अशी खात्री देतो. या तालुक्याने दिलेले प्रेम आम्ही विसरू शकत नाही. राहुरी असो किंवा गणेश कारखाना, हे दोन्ही कारखाने मला कुटुंबासारखे आहेत. मात्र, उसाची उपलब्धता नसल्याने मला हे कारखाने बंद ठेवावे लागले.

कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने व तात्कालीन आमदारांनी मोठी मदत केली होती. अडचणी आपल्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे आपण एकत्र बसून त्यातून मार्ग काढला पाहिजे. मी कारखाना हाती घेतल्यापासून अनेक जुने देणे आम्ही दिलेले आहेत. एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार कोणी जर सिद्ध केला तर मी खासदारकीचा राजीनामा देईन. यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने सर्वच कारखान्याच्या कामगारांचे पगार थकलेले आहेत. त्याला सरकारची धोरणेही कारणीभूत आहेत.

त्याविषयी आपण संसदेत आवाज उठविणार आहोत. कामगारांच्या वेदना मी समजून घेऊ शकतो. वास्तविकता सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे. उगाच काहीतरी सांगून कामगारांच्या व आमच्या भावनेशी कोणी खेळू नका. संचालक मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही खपून घेणार नाही. हे राजकारण करण्याचे व्यासपीठ नाही, कामगार उपोषणाला बसले म्हणून अनेकजण समर्थन देतील, भाषणे ठोकतील व निघून जातील. मात्र, कामगारांना पैसे मीच देणार आहे.

कामगार आमचेच आहेत, यापुढे अशा कोणत्याही आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, असे त्यांनी कामगारांना आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी हा प्रस्ताव मान्य केल्याने लिंबूपाणी देऊन या कामगारांचे उपोषण खा. डॉ. सुजय विखे व अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आले.

कारखान्यावर असलेल्या कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर कारखाना सुरू झाला व दोन हंगाम यशस्वी झाले. या दरम्यान आम्ही जिल्हा बँकेचा एक रुपयाही घेतला नाही. मात्र, नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेचा चुकीचा अर्थ लावून काही मंडळी आमची बदनामी करू पाहत आहेत. उपोषण काळातही अनेकांनी आमच्यावर आरोप केले. या सर्वांना एक आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी उत्तर देणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com