महाराष्ट्रात  काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही – राहुल गांधी
Featured

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही – राहुल गांधी

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन ‘महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मोठे निर्णय घेण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. मात्र महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे,’ असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे.

पण, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे याबाबत विचाले. त्यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या सकारला आम्ही पाठिंबा दिला आहे. पण, आम्ही पंजाब, छत्तीसगडसारखे त्या सरकारमध्ये महत्वाचे निर्णय घेणारे नाही. स्वतःचे सरकार चालवणे आणि संयुक्त सरकार चालवणे यात फरक असतो. याचबरोबर महाराष्ट्र हे देशातील सर्वात कनेक्टेड असलेले राज्य आहे. लोकसंख्येची घनता तेथे दाट आहे. त्यामुळे तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्र कोरोना विरुद्धची लढाई त्यांच्या पद्धतीने लढत आहे. त्याला केंद्राने पूर्ण सपोर्ट करणे गरजेचे आहे असे सांगितले.

देशात लॉकडाऊन फेलकेंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही. त्यामुळे राज्य सरकार योग्यरित्या काम करु शकत नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. देशात लॉकडाऊन फेल ठरल्याचंही ते म्हणाले. लॉकडाऊनचे चारही टप्पे अयशस्वी ठरले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ज्याप्रमाणे सूट देण्यात आली आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे आता यापुढे प्लान बी कोणता असणार आहे, असा प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला केलाय.

महाआघाडीत बिघाडी?
दरम्यान महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये बेबनाव असल्याची चर्चा असतानाचकाही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सध्याचं सरकार हे आमचं सरकार नाही तर शिवसेनेचं आहे असं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलताना म्हटलं आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com