Thursday, April 25, 2024
Homeनगरमागील सभेने मंजुरी दिलेली कोट्यवधी रुपयांची कामे नामंजूर

मागील सभेने मंजुरी दिलेली कोट्यवधी रुपयांची कामे नामंजूर

राहाता पालिकेची सर्वसाधारण सभा वादळी; भाजप-सेना-विखे गटाच्या नगरसेवकांचे बंड

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता नगरपालिकेची सर्वसाधरण सभा वादळी ठरली असून मागील सभेतील कोट्यवधी रुपये खर्चाची कामे 16 विरुध्द 2 मतांनी नामंजूर करण्यात आली. कामकाजात विश्वासात घेतले जात नाही, नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होत नाहीत, या कारणांनी सत्ताधारी भाजप पिपाडा गटाच्या सहा, विखे गटाचे आठ व शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी विरोध केला तर तीन वर्षांत प्रथमच नगरसेवकांच्या प्रोसिडिंगवर सह्या घेण्यात आल्या. या संपूर्ण सभेचे चित्रीकरण करण्यात आले. मुख्याधिकारी असिमा मित्तल यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.

- Advertisement -

राहाता पालीकेला गेल्या आठ महिन्यांपासून मुख्याधिकारीच नसल्याने प्रभारी राज सुरू होते. गेल्या चार सर्वसाधारण सभांना मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी आयएएस अधिकार्‍यांकडे पालिकेचा पदभार असल्याने त्यांनी सर्वच नगरसेवकांच्या तक्रारीवरून सभेचे व्हीडिओ चित्रीकरण केले. तसेच ज्या विषयांना नगरसेवकांचा विरोध होता त्यावर मतदान घेतले. यात मागील सभेत आर्थिक बाबतीत असलेल्या टेंडरांना 16 नगरसेवकांनी हरकत घेतली. सदर विकास कामांचे टेंडर आमच्यासमोर फोडले नसल्याची तक्रार सर्व 16 नगरसेवकांनी लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांच्याकडे केली. यावेळी मतदान घेतले असता 16 नगरसेवकांनी हात उंचावून याला विरोध केल्याने 16 विरुद्ध 2 मतांनी तो विषय नामंजूर करण्यात आला.

मुख्याधिकारी असिम मित्तल यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या 8 महिन्यांत घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील सर्व आर्थिक विषयांना सर्वानुमते विरोध करण्यात आलेला आहे. याबाबत आम्ही वारंवार प्रोसिडिंग बुकची नक्कल मागितली असताना एकाही सभेची नक्कल आम्हाला मिळालेली नाही. सभागृहात मनमानी कारभार चालत असून सदस्यांची दिशाभूल करून निविदा फोडण्यात आल्या.त्या सर्व निविदा नियमबाह्य असून सर्व निविदा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करत प्रोसिडिंग बुकची नक्कल त्वरित मिळावी ही मागणी केली.

या निवेदनावर उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, विरोधी पक्ष गटनेते विजय सदाफळ, शारदा गिधाड, निवृत्ती गाडेकर, सचिन गाडेकर, नीलिमा सोळंकी, अनिता काळे, डॉ. मंगला गाडेकर, सलिम शहा, अनुराधा तुपे, सविता सदाफळ, सुरेखा मेहेत्रे, मनीषा बोठे, सागर लुटे, साहेबराव निधाने, हरी पवार, भीमराज निकाळे या नगरसेवकांच्या सह्या आहेत.

नगरसेवकांतील नाराजी नाट्य
राहाता शहरात विकासकामे करताना नगराध्यक्षा पिपाडा व त्यांचे पती कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेत नसल्याने त्यांच्या गटाचे सहा नगरसेवक बाजूला गेले तर त्यांना पाठिंबा दिलेले सेनेचे नगरसेवकही विरोधात असून विखे गटाच्या आठ नगरसेवकांच्या सहकार्यामुळे कामकाज सुरू होते. मात्र त्यांच्याही प्रभागात कोणतेही कामकाज होत नसल्याने व नागरिकांच्या संतापाला त्या नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनीही यावेळी उघड बंड केले.

नगरसेविका पतिदेव बाहेर
दरवेळेस सर्वसाधारण सभेत बसणारे महिला नगरसेवकांच्या पतिदेवांना या बैठकीला मात्र बसता आले नाही. अतिशय शिस्तीत व नियमांना धरून ही सभा आयएएस महिला अधिकारी यांनी घेतल्याने अनेकांचा हिरमोड झाला. मात्र सर्व नगरसेवकांनी न्याय मिळाल्याचे यावेळी सांगितले. तसेच तातडीने प्रोसिडिंग बुकाची नक्कल नगरसेवकांना देण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले.

सर्वसाधारण सभेमध्ये आमच्या विरोधी नगरसेवकांनी गावात चालेली रस्त्यांची कामे बंद करा, असा विषय मांडला. शहरात विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या कार्यारंभ आदेश देऊन मोठ्या प्रमाणावर कामे चालू झालेली असल्यामुळे विरोधकांचा जळफळाट झाला व त्यामुळे त्यांनी ही कामे बंद करा, अशी मागणी केली. वास्तविक कार्यारंभ आदेश मुख्याधिकार्‍यांच्या सहीने दिलेला असतो व जिल्हाधिकार्‍यांची प्र. मा. मिळालेली असताना व नगरविकास विभागाने मंजुरी दिलेली असतानाही अशी कामे बंद करता येत नाहीत व ती कायदेशीर बंदही होत नाहीत. परंतु केवळ पिपाडांना विरोध करा असा एक कलमी कार्यक्रम घेऊन निघालेल्या नगरसेवकांना आपण सर्वसामान्य जनतेचे रस्त्यांचे कामे बंद करा अशी मागणी करताना जनतेमध्ये अशा मागणीमुळे संतापाची भावना आहे. गावात सुरु असलेली औषध फवारणी बंद व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020 या सारख्या विषयाला सुद्धा विरोधकांनी विरोध नोंदविला. त्यामुळे त्यांनी विरोधाला विरोध करणे बंद करावे व जनतेच्या हिताच्या कामाला मदत करता येत नसेल तर अडथळा तरी आणू नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आजच्या सभेत जनतेच्या प्रश्न सोडविण्याच्या विषयांना केलेल्या विरोधाचे व्हिडिओ चित्रिकरण होते, याचे सुद्धा भान केवळ पिपाडांचा द्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना राहिलेले नाही. यापेक्षा केविलवाणा प्रकार तो कोणता? वीरभद्र महाराज त्यांना सुबुद्धी देवो अशी भावना व्यक्त करते.
– ममता पिपाडा, नगराध्यक्षा

- Advertisment -

ताज्या बातम्या