ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात
Featured

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात

Sarvmat Digital

शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. परंतु काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामतील पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यातील खरीप हंगामाची पूर्णपणे वाट लावली. त्यातच आता रब्बीच्या पिकांवरही ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. अगोदरच शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा ढगाळ वातावरणामुळे मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिवाळीनंतर आपल्या शेतीच्या मशागती करून रब्बीची पेरणी सुरु केली. पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

ऊसामध्ये कांदा, हरभरा आदी अंतर्गत पिके देखील केली आहेत. त्याबरोबरच कांदा, गहू, ज्वारी, हरभरा यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. परंतू सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. सुरुवातीपासूनच रोगाचा प्रादूर्भाव निर्माण झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. सततच्या ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गव्हावर मावा तर आला आहे मात्र, कधी न येणारी अळीही यंदा गव्हावर दिसू लागली आहे. तसेच परिसरातील उन्हाळी कांद्याचे रोप परतीच्या पावसाने गेले, मात्र आहे त्या रोपामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अजूनही शेतकरी कांदा लागवड करत आहेत.

या हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यावरही करप्याने आक्रमण केल्याने नवीन लागवड धोक्यात आली आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी विविध औषधांनी फवारणी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत.

अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
खरिपात कर्जबाजारी झालेला शेतकरी आता रब्बीतही कर्जबाजारी राहतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी ने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तर झाले, त्याच्या नुकसानीचा एक हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला. अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान भरपाई अजूनही अनेक शेतकर्‍यांच्या पदरात आलेली नाही. अशा विचित्र परिस्थितीत या परिसरातील बळीराजा सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने परिसरातील शेतकर्‍यांना पिकांवर आलेल्या रोगा संर्दभात योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com