पुणे : एसआरपीएफच्या 14 जवानांना करोनाची लागण
Featured

पुणे : एसआरपीएफच्या 14 जवानांना करोनाची लागण

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात काल राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एकाच कंपनीनीतल 14 जवानांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 33 जवानांचे अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत. या आधी सहा जवानांना करोनाची लागण झाली होती. या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संसर्ग झालेल्या जवानांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक पोलिसांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुण्यातील रामटेकडी येथील एसआरपीएफ क्रमांक दोनची एक कंपनी बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेली होती. बंदोबस्त पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनी 19 मे रोजी पुण्यात आली. त्यानंतर 21 मे रोजी काही जवानांना करोनाची लक्षणं दिसू लागली. त्यामुळे या कंपनीतील 20 जवानांच्या घशातील नमुने घेण्यात आले.

नमुने घेतल्यानंतर सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर काल आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या या सर्व जवानांवर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. नुकतेच मालेगावहून औरंगाबाद परतेलेल्या 67 जवानांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हे सर्व जवान करोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी जवानांना करोना झाल्याचे समोर आले आहे. तर पोलीस कर्मचार्‍यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाची लागण झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com