जळगाव : घरात बसणे, गर्दी टाळणे हीच मोठी देशसेवा : अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार ; साठेबाजी करणार्‍यांवर कारवाई करणार
Featured

जळगाव : घरात बसणे, गर्दी टाळणे हीच मोठी देशसेवा : अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार ; साठेबाजी करणार्‍यांवर कारवाई करणार

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवड्यापर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत सुरक्षेच्या दृष्टीने घरात बसणे व गर्दी टाळणे, हीच मोठी देशसेवा आहे. तसेच या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार असून जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी बुधवारी  संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण आदी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, परमेश्‍वर कृपेने जळगाव जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. जनतेने संयम पाळून स्वत:ची काळजी घेतल्यास कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला निश्‍चितच आपण हरवू शकणार आहोत.

पोलिसांनी देखील सक्तीची कारवाई न करता आवश्यकता नसताना देखील घराबाहेर पडणार्‍यांवरच कारवाई करावी. संकट जरुर मोठे आहे. मात्र, आपण गर्दी टाळून घरात राहूनच या संकटावर मात करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सध्याचा कालावधी साठेबाजी करुन पैसा कमवण्याचा नसून सेवा देण्याचा आहे. त्यामुळे अशा प्रकारची साठेबाजी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे म्हणाले की, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरविल्या जात आहे. अशा अफवा पसरवणार्‍यांवर प्रशासन कारवाई तर करणारच आहे, त्यासोबतच मुद्रीत माध्यमांनी देखील वस्तूनिष्ठ बातम्या नागरिकांपर्यंत पोहचवून शासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील डॉ.ढाकणे यांनी देखील केले. जिल्हा प्रशासनाकडे महिनाभर पुरेल एवढा सर्वच वस्तूंचा साठा असल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता संयम राखावा. पेट्रोलचा पुरवठा देखील नियंत्रित पद्धतीनेच केला जाणार आहे. खासगी दळणवळण बंद करण्यात आले असून फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या वाहनांचेच दळणवळण सुरू राहील. अंत्ययात्रेत देखील २० पेक्षा अधिक लोकांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. तहसीलदार व प्रांताधिकार्‍यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील उपचारासाठी जळगावला येण्याचा आग्रह करू नये. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात देखील उपचाराची योग्य ती सोय करण्यात आलेली आहे. रुग्णाला मोठ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय संबंधित ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार व प्रांताधिकार्‍यांच्या परवानगीने घेतील. त्यामुळे विनाकारण कोणीही असा हट्ट करू नये, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले.

आतापर्यंत जिल्ह्यात २९ रुग्णांची कोरोनासंदर्भातील तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दोन जणांचे अहवाल प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. जिल्हा रुग्णालयात २० खाटांचा कोरोना नियंत्रण स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच २० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

परदेशातून परत आलेली व्यक्ती, बाधिताच्या संपर्कातील व्यक्ती, श्‍वसनाचा त्रास असलेली व्यक्ती यांचीच फक्त तपासणी करण्याची सूचना असल्याने विनाकारण कोणीही तपासणीचा आग्रह धरू नये. पुणे, मुंबई या शहरातून गावाकडे परतणार्‍यांकडे संशयाने बघू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com