प्रवरासंगमच्या घटेश्‍वर मंदिराजवळ घाट व स्मशानभूमीची कामे करा

jalgaon-digital
3 Min Read

ग्रामस्थांची मागणी; जलफुगवट्यामुळे धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांचे होतात हाल

देवगडफाटा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील टोका प्रवरासंगम येथील नदीकाठी प्रवरा-गोदावरी संगमाशेजारी घटेश्‍वराच्या पुरातन मंदिराजवळ घाट बांधण्याची तसेच अमरधामचे काम करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, प्रवरासंगम येथे प्रवरा-गोदावरी नद्यांचा सगंम होतो अशा पवित्र ठिकाणी घटेश्‍वर मंदिर आहे. या ठिकाणी राज्यभरातून धार्मिक विधीसाठी व दर्शनासाठी नागरिक, भाविक येत असतात. येथे कायमच धार्मिक कार्यक्रम सुरू असतात.़ परंतु येणार्‍या भाविकांना घाट नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. जुना घाट जीर्ण झालेला असून तो जलफुगवट्यामुळे नेहमी पाण्यातच असतो. त्यामुळे नवीन घाट होणे आवश्यक आहे.

नगर जिल्ह्यातील हजारो कावडीवाले या ठिकाणावरून पाणी घेऊन पायी जातात व मंदिरात मूर्तींना अर्पण करतात. तेथे नदीपात्रातील पाणी घेण्यासाठी घाट नसल्याने अडचणी येतात. तसेच ऋषीपंचमीला हजारो महिला पवित्र स्नानासाठी याठिकाणी येतात अशावेळी गैरसोय होते. घटेश्वर मंदिराजवळ सिद्धेश्वर मंदिर देवस्थान येथे घाट असला तरी तो अपुरा पडतो अशावेळी घटेश्वर मंदिराजवळ नवीन घाट होण्याची गरज आहे. याठिकाणी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अशोक सिंघल, बाळासाहेब विखे पाटील आदी नेत्यांच्या अस्थि विसर्जन झाले आहे. अनेक वर्षे लोटली तरी कोणीच या कामाकडे आजपर्यंत लक्ष दिले नाही

प्रवरासंगम व टोका दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या 7 हजारांच्या आसपास आहे. प्रवरा-गोदावरी संगम होतो त्या जवळच घटेश्वर मंदिराजवळ जुने अमरधाम (स्मशानभूमी) आहे परंतु हे अमरधाम अनेक वर्षांपासून चोहोबाजूंनी काटेरी वेड्या-बाभळीच्या झुडपांच्या विळख्यात अडकले आहे. अंत्यविधीसाठी दोन शेडची आवश्यकता आहे परंतु याठिकाणी एकही शेड नाही. नदीपात्र जवळ असूनही स्नानासाठी सुविधा नाही. वीज जवळ असून वीजपुरवठा होत नाही. पावसाळ्यात जर निधन झाले तर अडचणीत आणखीच भर पडते. अंत्यविधीस आलेल्या लोकांना बसण्यासाठी सुध्दा व्यवस्थित जागा नाही. अमरधामकडे जाणारा अर्धा किलोमीटरचा रस्ताही खराब आहे. जायकवडीचा पाणी फुगवटा वाढल्याने आता चोहोबाजूंनी पाणी आहे. त्यामुळे भराव टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे घाट व अमरधाम काम होणे आवश्यक आहे.

ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून या दोन्ही कामाची मागणी आहे .परंतु अद्याप ही कामे रेंगाळली आहेत. अनेक वर्षे लोटली तरी कोणीच या कामाकडे लक्ष दिले नाही. टोका व प्रवरासंगम गावकर्‍यांनी लोकवर्गणीतून दोन वर्षांपूर्वी 1500 ट्रॅक्टरच्या खेपा टाकून काही प्रमाणात भराव केला आहे व थोड्याफार प्रमाणात जागा केली आहे. पण हे काम मोठे आहे हे होण्यासाठी प्रशासनाच्या मदतीची गरज आहे असे गावातील नागरिकांना वाटते.

टोका, प्रवरासंगम ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी सिद्धेश्वर व घटेश्वर मंदिर परिसरात प्रवरा, गोदावरी व गुप्त सरस्वती असा नद्यांचा त्रिवेणी संगम होत असल्याने राज्यभरातून धार्मिक विधीसाठी भाविक येतात.त्यामुळे येथे शासनाने मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लावावीत.
-सुनील बाकलीवाल, सरपंच, प्रवरासंगम

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *