कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात; सरकारने आर्थिक सहकार्य करावे
Featured

कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात; सरकारने आर्थिक सहकार्य करावे

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सिन्नर । वार्ताहर

दुष्काळावर मात करण्यासाठी कमी पाण्यावर चालणारा व्यवसाय म्हणून पाळेमुळे खोलवर रुजलेल्या पोल्ट्री व्यवसायात अग्रेसर तालुका अशी सिन्नरची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन ठरलेल्या या व्यवसायाला जगात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना या विषाणूने ग्रासले असून परिणामी पोल्ट्रीचालक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने पोल्ट्री व्यवसायिकांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून आमदार माणिकराव कोकाटे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

सिन्नर पोल्ट्री प्रोडूसर या शेतकरी उत्पादक कंपनीने आ. कोकाटे यांच्यासमोर व्यवसायातील समस्यांचे गाऱ्हाणे मांडत सरकार दरबारी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची मागणी केली. अध्यक्ष योगेश घोटेकर, कानिफनाथ घोटेकर, अनिल पवार, संपत कांगणे, किरण आसळक, संजय वारुंगसे, किरण सानप, वामन पवार यांचेसह शेतकरी यावेळी उपस्थित होते. ब्रॉयलर कोंबडी बनविण्यासाठी साधारण येणारा खर्च ८० रुपये प्रतीकिलो इतका असून आज साडेसात रुपये प्रतीकिलो पर्यंत बाजारदर घसरले असल्याने खाजगी कुक्कुटपालन करणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या तोट्यात आला आहे.

तर अंडी उत्पादनाचा दर ३.२० रूपये असताना प्रत्यक्ष विक्री मात्र २.५० रुपये या दराने करावी लागत आहे. एकट्या सिन्नर तालुक्यातून दररोज १० लाख अंडी आणि महिन्याकाठी ३० लाख ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री करण्यात येते. सुमारे तीन हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असून कोरोनाच्या भीतीने पोल्ट्री उत्पादनांची पीछेहाट सुरु आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याकडे आ. कोकाटे यांचे लक्ष वेधण्यात आले. कोरोना विषाणूमुळे आलेल्या मंदीमुळे पोल्ट्री उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मदत करावी. त्यासाठी सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाठपुरावा करावा असे साकडे या शेतकऱ्यांनी आ. कोकाटे यांना घातले.

केवळ सिन्नर नाही तर संपूर्ण राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी कोरोना विषाणूमुळे अडचणीत आला आहे. यातून सावरण्यासाठी या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे राहील. पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या समस्या पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासमोर मांडण्यात येतील. सभागृहातील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने सरकारला योग्य निर्णय घेण्यास भाग पडले जाईल असे आश्वासन आ. कोकाटे यांनी याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

Deshdoot
www.deshdoot.com